Breaking News

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, … लढाई मनुवादी विचारधारेच्या विरोधात

काँग्रेसची लढाई भाजपा, नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरी यांच्या विरोधात नसून मनुवादी विचारधारेच्या विरोधात आहे, देशाचे संविधान व लोकशाही कायम राखण्यासाठी आहे. आम्हाला हिटलर बनायचे नाही, देशात सर्व धर्माचे लोक एकत्र रहावे हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवले आहे. काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, देशासाठी काँग्रेसचे लोक फासावर चढले, नरेंद्र मोदींच्या भाजपाचे लोक स्वातंत्र्य चळवळीत कुठे होते ? स्वातंत्र्यांच्या लढाईवेळी आरएसएसचे लोक कुठे लपून बसले होते? असा सवाल करून लोकसभा निवडणुकीत मनुवादी विचाराच्या सरकारचा पराभव करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केले. नागपूर येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे पुढे बोलताना म्हणाले की, भाजपा धर्माच्या नावावर मते मागत आहे, काँग्रेसला राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण दिले पण ते आले नाहीत असा खोटा प्रचार नरेंद्र मोदी करत आहेत. प्राणप्रतिष्ठेचे काम साधू संतांचे आहे पण हे नवीनच साधू निघाले आहेत. दलित समाजाला आजही मंदिरात प्रवेश मिळत नाही तर तर मी एकटा मंदिरात कसे जाऊ? नवीन संसदेच्या पायाभरणीला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना बोलावले नाही. नवीन संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावले नाही, राम मंदिराच्या उद्घाटनालाही बोलावले नाही. ते राष्ट्रपती असूनही मागासवर्गीय असल्याने भाजपा व मोदींनी त्यांना न बोलावून दलित समाजाचा अपमान केला. मोदी व भाजपा एससी, एसटी, आदिवासी समाजाचा सातत्याने अपमान करत आहेत, हा अपमान आधी बंद करा असे निक्षूण सांगितले.

पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान भाजपानेच कायम ठेवले असे नरेंद्र मोदी सांगत आहेत, ते साफ खोटे आहे. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी, पंडित नेहरु यांनी संविधान बनवण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवली व ते संविधान आजपर्यत काँग्रेस पक्षाने टिकवून ठेवले आहे. आरएसएसच्या कार्यालयात बाबासाहेबांचा फोटोही लावत नाहीत व कालपर्यंत देशाचा तिरंगा झेंडाही आरएसएसच्या कार्यालयावर फडकवला नाही अशी टीकाही केली.

मल्लिकार्जून खर्गे बोलताना म्हणाले की, भाजपाचे सरकार आले तर दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते, १० वर्षातील २० कोटी नोकऱ्या कुठे गेल्या हे आता गडकरी व मोदींना विचारा. परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख देतो म्हणाले पण हे पैसेही मिळाले नाहीत, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही. नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलतात, खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपाची पद्धत आहे. भ्रष्टाचाऱ्यांना जवळ करु नका असे म्हणणाऱ्या मोदींनीच २३ भ्रष्ट नेत्यांना भाजपात घेतले. विरोधी पक्षात होते तोपर्यंत भ्रष्टाचारी आणि भाजपात आले की पवित्र झाले का? असा सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या जाहिरनाम्यात ५ न्याय व २५ गॅरंटी दिल्या आहेत. ३० लाख सरकारी नोकऱ्या, गरिब महिलांना वर्षाला १ लाख रुपये, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवणार, कामगारांचे अधिकार व हक्क कायम करणार, सामाजिक सुरक्षा देणार. शेतमालाला एमएसपीचा कायदा, पीकविम्याचे पैसे ३० दिवसात देणार. जीएसटीमुक्त शेती करण्याची गॅरंटी काँग्रेसने दिलेली आहे. काँग्रेसची गॅरंटी वॉरंटीसहित आहे, मोदी गँरंटीसारखी खोटी नाही, असे आश्वासनही यावेळी दिले.

प्रचार सभेआधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिक्षाभूमीला भेट देऊन राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *