Breaking News

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत मोफत उपचार, घराघरात पाईप गॅस जोडणी, गरीबांच्या घरात मोफत वीज, प्रत्येक क्षेत्रात युवकांचे भविष्य उजळणाऱ्या लाखो संधी, महिलांना आर्थिक समृद्धी, समृद्ध, संपन्न भारत हा मोदी सरकारचा संकल्प आहे. यासाठीच मोदी यांना तिसऱ्या वेळी पंतप्रधानपद द्या, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी भंडारा-गोंदिया मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा लोकसभा निवडणूक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा.प्रफुल्ल पटेल यावेळी उपस्थित होते .

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, मोदी सरकारने दहा वर्षांच्या कार्यकाळात एक कोटी महिलांचे आयुष्य लखपती दीदी योजनेतून उजळले, नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळी पंतप्रधान होतील, तेव्हा देशातील तीन कोटी महिला लखपती दीदी बनतील हा मोदी सरकारचा संकल्प आहे असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, बाबासाहेबांचा सातत्याने अपमान करणारी काँग्रेस आज बाबासाहेबांच्या नावाने मते मागत घराघरात फिरत आहे. पण याच काँग्रेसने पाच दशके सत्तेवर असूनही बाबासाहेबांना भारतरत्न दिले नाही, त्यांचा सातत्याने अपमान केला. भाजपा सरकारने बाबासाहेबांशी संबंधित असलेल्या पाचही ठिकाणांना पावित्र्य दिले. भाजपा सत्तेवर आल्यास आरक्षण संपुष्टात आणणार असा संभ्रम जनतेमध्ये काँग्रेसकडून पसरविला जात आहे, आमच्याकडे बहुमत आहे, पण आम्ही बहुमताचा उपयोग कधीही आरक्षण हटविण्यासाठी केला नाही, पण कलम ३७०, तिहेरी तलाक हटविण्यासाठी निश्चितच केला. जोपर्यंत भाजपा सत्तेवर आहे, तोवर आरक्षण रद्द करणार नाही आणि रद्द करू दिले जाणार नाही ही नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे, असे आश्वासनही यावेळी दिले.

अमित शाह पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षात मोदीजींनी दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले आहे. ७० वर्षात काँग्रेसने कलम ३७० ला अनौरस अपत्याप्रमाणे कवटाळून ठेवले, ५ ऑगस्ट २०१९ ला मोदीजींनी हे कलम हटवून काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणले. काँग्रेसने राम मंदिराचा प्रश्न वर्षानुवर्षे लोंबकळत ठेवला. मोदीनी राम मंदिराचा संकल्प पूर्ण केला. एवढेच नव्हे, तर बाबा विश्वनाथ कॉरिडॉर, बद्रीनाथ केदारनाथची नूतन नगरी, सोमनाथ मंदिराला सोन्याची झळाळी, गुजरातेतील शक्तिपीठाची ४०० वर्षांनंतर पुनर्स्थापना करून नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाचा प्रत्येक सांस्कृतिक मानबिंदू पुनरुज्जीवित केल्याचे सांगितले.

राहुल गांधी यांच्यावर अमित शाह यांनी टीका करताना म्हणाले की, राहुल गांधी कधीच वाचन करत नाहीत. आता पुन्हा ते गरीबी हटविण्याची घोषणा करत आहेत. हीच घोषणा इंदिराजींनी केली, त्या गेल्या, राजीव गांधी गेले, सोनियाजींनी काहीही केले नाही, पण नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत देशातील २५ कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले, ८० कोटी लोकांना पाच वर्षे मोफत धान्य देऊन त्यांचे जीवन सुरक्षित केले, पुढच्या पाच वर्षांकरितादेखील १२ कोटीहून अधिक घरांत शौचालये, ४ कोटी गरीबांना घरे दिली. आणखी ३ कोटी गरीबांना घरे देण्याची घोषणा आजच मोदींनी केली. १४ कोटी गरीबांना नळाद्वारे पाणी, घराघरांत पाईपद्वारे गॅस जोडण्या देणार असल्याचेही सांगितले.

अमित शाह पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये राहुल गांधींच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी २२ हजार कोटी राखून ठेवले होते. २०२२-२३ मध्ये मोदीजींनी एक लाख २५ हजार कोटींची तरतूद शेतकऱ्यांसाठी केली. भंडारा-गोंदिया क्षेत्रात धान खरेदी दुप्पट झाली आहे. समृद्धी महामार्ग, गावागावांना जोडणारे पक्के रस्ते, गरीबांसाठी एक लाख घरे, सात लाख आयुष्मान भारत लाभार्थी, दोन लाख १० हजार महिलांसाठी उज्ज्वला गॅस जोडण्या, २.४० लाख घरांत नळ जोडण्या देण्याचे काम मोदी सरकारने केले. सोनिया- मनमोहन सरकार मध्ये मंत्री असलेल्या शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, उद्धव ठाकरे, शरद पवार पक्ष फोडल्याबद्दल भाजपाला दूषणे देतात. हे काम आम्ही नाही, तर उद्धवच्या पुत्राने, पवारांच्या कन्येने केले. आज अर्धी शिवसेना, अर्धी एनसीपी आणि त्यांनी बनविलेली अर्धी काँग्रेस महाराष्ट्राचे काय भले करणार, असा खोचक सवालही केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *