Breaking News

…आणि फडणवीसांनी केली शरद पवारांच्या “त्या” डावपेचाची कॉपी? पवारांनी ईडीला दिलेल्या आव्हानाची फडणवीसांनी केली पुन:रावृत्ती

साधारणत: सप्टेंबर २०१९ मध्ये जवळपास महाराष्ट्रातील सर्व व्हाट्सअॅप धारकांच्या मोबाईलवर एक पत्र झळकले आणि काही मिनिटातच सर्व प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ईडीची नोटीस असे वृत्त झळकायला सुरुवात झाली. या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकिय वर्तुळाबरोबरच सर्वसामान्य नागरीकांना एक आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु त्यानंतर शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत ईडीच्या नोटीशीची वाट न पहाता आपण स्वत: ईडी कार्यालयात जाणार असल्याची घोषणा केली. अगदी त्याचधर्तीवर राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधी पाच वेळा पोलिसांनी पत्र पाठविल्यानंतरही त्याबद्दलची वाच्यता कोठेही झाली नाही. मात्र सहाव्यांदा पोलिसांचे पत्र आल्यानंतर ज्या फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत आपण जबाब देण्यासाठी पोलिस स्टेशनला जाणार असल्याची घोषणा करत जी राजकिय राळ उठविली. त्यावरून फडणवीसांनी शरद पवारांच्या त्या राजकिय डावपेचाची पुन:रावृत्ती केल्याची राजकिय चर्चा सुरु झाली.

शरद पवारांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात स्वत: जाण्याची घोषणा केल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये मुंबईत जमा व्हायला लागले. विशेष म्हणजे बॅलार्ड पिअर्स येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयाशेजारीच ईडीचे कार्यालय असून या कार्यालयाजवळही कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. शरद पवार हे जर ईडी कार्यालयात गेले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो असा पोलिसांना अंदाज आल्याने शरद पवारांनी जाहीर केलेल्या तारखेच्या दिवशीच सकाळीच त्यावेळचे पोलिस सह आयुक्त सदानंद दाते यांनी पवारांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी जात शरद पवारांशी चर्चा केली. त्याचबरोबर ईडीच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. त्यावेळी ईडीने पवारांना सध्या येण्याची गरज नाही. ज्यावेळी गरज वाटेल त्यावेळी आम्ही बोलावू असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर ईडीकडून शरद पवारांना नोटीस आल्याचे ऐकिवात नाही नंतर एका प्रकरणात त्यांचा जबाब मागवून घेण्यात आला.

सध्या राज्यात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी अवैधरित्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे आणि मंत्र्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी राज्य सरकारकडून शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या टॅपिंग प्रकरणातील अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यत पोहोचला कसा ? याचा तपास मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. याच आधारे फडणवीसांचा जबाब घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी फडणवीस यांना प्रश्नावली पाठवून देत त्यांचे म्हणणे सादर करण्याची विनंती केली होती. परंतु पाचही वेळेस देवेंद्र फडणवीसांनी कोणतेही प्रत्युत्तर मुंबई पोलिसांना दिले नाही. मात्र सहाव्यांदा पोलिसांनी फडणवीसांना पाठविल्या पत्रात जबाब देण्यासाठी बीकेसीतील सायबर पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राजकिय डावपेचाचा भाग म्हणून त्यांनी जाहिर पत्रकार परिषद घेत पवारांच्या डावपेचाची पुन:रावृत्ती करण्याचा प्रयत्न केला.

सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असल्याने राज्यात नव्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी महाविकास आघाडीकडून काळजी घेण्यात येत आहे. मात्र फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर लगोलग सुत्रे हालली आणि पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करत तुम्ही येवू नका आम्हीच जबाब नोंदविण्यासाठी येतो असा निरोप दिला. यामुळे काही काळ फडणवीसांसमोर महाविकास आघाडी मागे सरकली असा जरी संदेश जनतेत जाणार असला तरी फडणवीसांनी शरद पवार यांच्या डावपेचाची पुन:रावृत्ती करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *