Breaking News

अरविंद सावंत यांची खोचक टीका, घोषणा ७५ हजाराची आणि नियुक्ती पत्रे दोन हजार

मागील तीन महिन्यात राज्यातून तीन मोठे गुंतवणूकीचे प्रकल्प महाराष्ट्रातून पळवून नेले. तर दुसऱ्याबाजूला राज्यातील बेरोजगारांना शासकिय नोकरी देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यावरून उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आज शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.

शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत अरविंद सावंत बोलत होते.

यावेळी बोलतना अरविंद सावंत म्हणाले की, महाराष्ट्राचा विकास करणारे प्रकल्प आधी पळवले आणि आता रोजगार मेळावे घेत आहेत, ७५ हजार बेरोजगारांना नियुक्तीपत्रे देण्याची घोषणा करून फक्त दोन हजार तरुणांना नियुक्तीपत्रे दिली गेली, ही बेरोजगारीची थट्टा आहे अशी टीकाही केली.

मोठमोठे प्रकल्प गुजरातला पळवले गेले आणि ते काम संपल्यानंतर आज गुजरातमध्ये निवडणूक जाहीर झाली. म्हणजेच निवडणुकीसाठीच ते प्रकल्प पळवले गेले. आज महाराष्ट्रात अनेक प्रकल्प आणण्यासाठी दोन लाख कोटींचा निधी देऊ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. केंद्र सरकारच सर्व प्रकल्प राबवते असा याचा अर्थ होतो आणि दुसरा अर्थ म्हणजे कदाचित महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणूका लागतील असे भाकितही त्यांनी यावेळी केले.
निवडणूक आयोगाकडून गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका एकाच तारखेला जाहीर केल्या जाणे अपेक्षित होते. परंतु यावेळी प्रकल्प पळवायचे होते म्हणून हिमाचलची निवडणूक आधी घोषित केली पण गुजरातची केली नव्हती आणि प्रकल्प पळवल्यानंतर जाहीर केली गेली असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मोदी यांनी आतापर्यंत केलेल्या घोषणा म्हणजे भूलभुलैय्या आहे आणि त्याचा विदारक अनुभवही जनतेला येत आहे अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतामध्येही हेलिकॉप्टर घेऊन जावे असा खोचक टोला लगावत खासदार सावंत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री पत्रकारांना घेऊन शेतात फिरले, गल्फकार्ट गाडीतून फिरले, शेतामध्ये काम केले, स्ट्रॉबेरीचा विषय मांडला. पण आज राज्यातील शेतकऱ्यांचे काळीज फाटले आहे. आत्महत्या होत आहेत. पण शिंदे हे शेतकऱ्यांना मदत करायची सोडून प्रसिध्दी करत फिरत आहेत, असा उपरोधिक टोलाही त्यांनी केला.
गद्दारांचा प्रमुख कृषीमंत्री असूनही त्यानेही शेतकऱ्यांना काहीही दिले नाही असे ते म्हणाले.

मुंबई, ठाण्यात फिल्मसिटी होणार अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. त्यासाठी जमीन कुठे आहे, कुठून आणणार असा सवाल त्यांनी करत केंद्र सरकारने बुलेट ट्रेनसाठी मोफत जमीन घेतली आणि आम्हाला मात्र मेट्रोसाठी कांजुरमार्गला जागा विकत घ्यायची आहे, धारावी प्रकल्पासाठी जागा विकत घ्यायची आहे खोचक टोलाही त्यांनी लगावला.

मोरबी पूल पडला ही घटना काळीज फाटणारी होती. तरीही मोदींचे गुजरातमधील कार्यक्रम थांबले नव्हते. असाच प्रकार बंगालमध्ये घडला होता तेव्हा पंतप्रधान म्हणले होते इट्स नाट अॅक्ट ऑफ गॉड, इट्स अॅक्ट ऑफ फ्रॉड. मग आता हा तुमचा अॅक्ट ऑफ फ्रॉड नाही का असा मर्मभेदी सवालही त्यांनी यावेळी केला.

पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात लाखो कोटींचे प्रकल्प येणार असे सांगितले पण ते कोणते प्रकल्प आहेत याची माहिती मात्र दिली नाही. महाराष्ट्रात रेल्वेचा ७५ हजार कोटींचा प्रकल्प आहे म्हणतात मग नक्की कुठे रेल्वेलाईन टाकताय, कुठे रुळ टाकणार, त्या प्रकल्पामुळे किती रोजगार मिळणार हे तरी सांगा मोदीजी असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.

‘स्वातंत्र्याचा अमृतकाल म्हणून ७५ हजारांचा आकडा. पण देशाच्या पंतप्रधानांनी राज्यांमधील नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे देण्याचा कार्यक्रम कधी झाला आहे का….ही बनवाबनवी आहे. निवडणुकीसाठी असलेली राजनीती आहे, असा आरोप करत खासदार सावंत पुढे म्हणाले, नियुक्तीपत्रे देण्याचा कार्यक्रम कधी झाला का, ही चुनावी नीती आहे. प्रत्येक गोष्टीचा इव्हेन्ट करायचा आणि एक खोटी गोष्ट पन्नास वेळा बोलायची म्हणजे ती खरी वाटेल असे यांचे कारस्थान सुरू आहे’ अशी टीकाही केली. दैनिक ‘सामना’मध्ये आजच्या अंकात प्रसिध्द झालेल्या शासकीय जाहिरातीबद्दलही यावेळी प्रसारमाध्यमांनी खासदार सावंत यांना प्रश्न विचारला. त्यावर ‘ती जाहिरात सरकारी आहे, कोणत्या राजकीय पक्षाची नव्हे’ असे सावंत यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या जाहिराती सामनामध्ये प्रसिध्द झाल्या आहेत. त्या नियमानुसार सरकारला द्याव्याच लागतात असेही ते म्हणाले.

‘कॉंग्रेसने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना भारत जोडो यात्रेमध्ये येण्यासाठी निमंत्रण दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे. ते प्रत्यक्ष यात्रेमध्ये सहभागी होण्याबाबत वेळ आणि कार्यक्रमानुसार निर्णय घेतील’ असेही त्यांनी सांगितले.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांची टीका, उबाठा रंग बदलणारा सरडा

युतीमध्ये असताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात होते. आता मोदी यांच्या नावाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *