Breaking News

मंदिरात धूप घालण्याच्या मुद्यावरून शिंदे, पाटील यांच्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीसांनी दिले हे उत्तर विधान परिषदेत रंगली खडाखडी

नाशिक मध्ये मुस्लिम समुदायाकडून काढण्यात आलेल्या संदल मिरवणूकीच्या मार्गात लागणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात धुप घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावरून राज्यात भाजपाप्रणित संघटनांच्या प्रतिनिधींकडून मोठा गदारोळ माजविण्यात आला. त्यामुळे नाशिकमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर राज्य सरकारने तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली. त्या एसटीच्या अनुषंगाने विधान परिषदेत पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी याविषयीचा मुद्दा उपस्थित करत एसआयटीचा अहवाल कधी मिळणार असा सवाल केला.

१५ मे रोजी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात काही मुस्लीम धर्मीयांनी संदल मिरवणुकीदरम्यान प्रवेशाचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला. यासंदर्भातले काही व्हिडीओही व्हायरल झाले होते. संदल मिरवणुकीदरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप देऊन नंतर ही मिरवणूक पुढे निघते, अशी प्रथा असल्याचा दावा नंतर करण्यात आला. यासंदर्भात दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपही झाले. याबाबत नंतर मिरवणूक काढणाऱ्या व्यक्तींनी कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असं म्हणत दिलगिरीही व्यक्त केली.

यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशी कोणती प्रथा आहे की नाही? किंवा कुणी मुद्दाम धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे का? यासंदर्भात मंदिर ट्रस्टच्या तक्रारीची दखल घेऊन सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे.

ही पेशवे काळापासून चालत आलेली प्रथा आहे. अशी प्रथा होती का? तशी असेल, तर या बाबतीत परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न कुणी केला का? नेमकी चूक कुणाची होती? जाणीवपूर्वक यात जातीभेद, धर्मवाद निर्माण करण्यासाठी कुणी प्रयत्न केले होते का? एसआयटीकडून याबाबत काय अहवाल प्राप्त झालेला आहे? असा प्रश्न शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.

शशिकांत शिंदेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांनी सरकारची सविस्तर बाजू मांडली. अशी परंपरा आहे का? हाच वादाचा भाग आहे. काही लोक म्हणतात ती आहे, काही म्हणतात अशी कोणतीही परंपरा नाही. २०२२मध्ये ही मिरवणूक ते दरवाजातून आत घेऊन गेले. तिथे सेल्फी काढत होते, शूटिंग करत होते. याचे व्हिडीओ फूटेजही उपलब्ध आहे. इथे प्रश्न हा आहे की मंदिराच्या ट्रस्टींनी तक्रार केली आणि सांगितलं की ‘अशी कोणतीही परंपरा नाही, हा आमच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे’. त्यानंतर तक्रार दाखल करून घेण्यात आली. दोन्ही बाजूची बैठक झाली. त्यात तिथे जाणाऱ्या लोकांनी क्षमा मागितली आहे. त्यामुळे आता तिथे शांतता आहे, असंही सांगितले.

शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या अहवालाबाबतच्या मुद्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एसआयटीचा अहवाल अजून आलेला नाही. ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय, त्यांना सीआरपीसी ४१ नुसार नोटीस देण्यात आलेली आहे. त्याची पुढची चौकशी चाललेली आहे, असंही स्पष्ट केले.

यावेळी बोलताना कपिल पाटील यांनी कोकणातील प्रथा-परंपरेबाबतचे उदाहरण देत म्हणाले, घटनेनं जितकं धार्मिक स्वातंत्र्य दिलंय, तितकंच श्रद्धेचंही दिलंय. श्रद्धेच्या स्वातंत्र्यात जाणीवपूर्वक कुणी वाद निर्माण करत असेल आणि परंपरा नाही असं सांगत असेल तर संयुक्त परंपरांच्या आड येणं हाच घटनाद्रोह आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांच्या उत्तरावर आक्षेप घेतला.

कपिल पाटील यांच्या आक्षेपानंतर पुन्हा फडणवीसांनी त्यावर उत्तर देताना म्हणाले, कुठल्याही श्रद्धा व परंपरा पाळण्यासाठी शासनाची मनाई नाही. शासन त्यात कुठेही मध्ये येणार नाही. हिंदू-मुस्लिमांनी एकमेकांना सांभाळून घेतलं तर त्यापेक्षा चांगलं काय असेल? पण जर कुठे परंपरेच्या नावाखाली खोडसाळपणा चालत असेल, तर आपल्याला दोन्ही बाजूच्या भावना समजून घ्याव्या लागतील. कुणी म्हटलं की आम्हाला एखाद्या मशिदीसमोर जाऊन नाचायचं आहे, माझी ती श्रद्धा आहे, तर अशी श्रद्धा कामाची नाहीये. कारण त्यांचं म्हणणं आहे की नाचता येणार नाही. त्यातून धार्मिक तेढच निर्माण होणार असे स्पष्ट केले.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ट्रस्टींना धर्मादाय आयुक्तांनी नियुक्त केले आहे. त्यात सरकारी अधिकारीही आहेत. त्यांनी एखादी तक्रार दिली, तर त्याची दखल घेणं हे सरकारचं काम आहे. प्रथा-परंपरेच्या नावाखाली गोंधळ नाही घालता येणार. सगळ्यांनी एकमेकांच्या धर्माप्रती श्रद्धा ठेवावी. तरच संविधानाने दिलेल्या अधिकारांचं व्यवस्थित पालन केलं असं होईल. या प्रकरणाची चौकशी चालू असून तिथे पूर्णपणे शांतता आहे. महिन्याभरात एसआयटीच्या चौकशीचा अहवाल मागवण्यात येईल असेही स्पष्ट केले.

या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी, काँग्रेसचे भाई जगताप य़ांनी चर्चेत भाग घेतला.

Check Also

पिडीत महिला अपहरण प्रकरणी एच डी रेवन्ना यांना अटक

हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल-भाजपाचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने घरातील महिलेवरच जबरदस्ती करत बलात्कार केल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *