Breaking News

दौरा मुख्यमंत्री शिंदेंचा पण अचानक अयोध्येत आलेल्या फडणवीसांनी सांगितले, मी दिल्लीला जाणार मात्र प्रसारमाध्यमांचा फोकस फक्त एकनाथ शिंदे यांच्यावरच

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे बिगूल कधीही वाजण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील वज्रमुठ जाहिर सभांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर हिंदूत्वाचा नारा आणखी तीव्र करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्याचे आयोजन केले. त्यानुसार आज सकाळी अयोध्येत पोहोचले. त्यानंतर सुरुवातीला या अयोध्या दोऱ्यापासून लांब असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानकपणे अयोध्येत पोहोचत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत अयोध्या यात्रेत सहभागी झाली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता ते त्यांनी या दौऱ्यात सहभागी होण्याचे नेमके कारण स्पष्ट केले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझं रामजन्मभूमीशी नातं आहे. या ठिकाणच्या अनेक आठवणी माझ्या मनात आहेत. रामलल्लांचं दर्शन घेण्याची इच्छा माझ्या मनात होतीच. खूप दिवस मी ठरवत होतो. आमच्या सेंट्रल इलेक्शन कमिटीची मिटिंग दिल्लीत आहे तरीही मी अयोध्येत आधी आलो आणि इथून दिल्लीत जाणार आहे. रामजन्मभूमीच्या आंदोलनाशी मी जोडलेलो होतो. प्रत्येक कारसेवेला मी उपस्थित राहिलो. मनापासून मला आनंद होतो आहे की या ठिकाणी मला आज येता आल्याचे स्पष्ट केले.

राज्यात अवकाळीचं संकट आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर गेल्यावरून शरद पवार यांनी टीका केली. याबाबत विचारलं असता देवेंद्र फ़डणवीस यांनी या टीकेवर बोलताना म्हणाले, टीका करणं हे त्यांचं कामच आहे. राज्य कारभार कसा चालवायचा हे प्रभू रामचंद्राने सांगितलं आहे. प्रभू राम हे आमचे आदर्श आहेत. आम्हाला त्यांच्याबाबत आस्था आहे. महात्मा गांधी यांची संकल्पनाही राम राज्याचीच होती. रामराज्याची संकल्पना राबवायची असेल तर रामाचे दर्शन घेतलंच पाहिजे असं म्हणत पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासह मी अयोध्येत आल्याचा मला आनंद आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना ही एकनाथ शिंदेंसोबत आहे. कारण वारसा हा जन्माने मिळत नाही कर्माने आणि विचारांनी मिळतो. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा यांची १०० टक्के नैसर्गिक युती आहे. त्याच युतीचा उत्साह या ठिकाणी पाहण्यास मिळतो आहे अशी भावनाही फडणवीसांनी व्यक्त केली.

या मंदिर उभारणीचं साक्षीदार होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कोट्यवधी राम भक्तांचं स्वप्न पूर्ण होतं आहे. मी मोदीजींचे आभार मानेन. हे स्वप्न त्यांच्यामुळे पूर्ण होतं आहे. आम्ही नाराच दिला होता की मंदिर वहीं बनाएंगे. माझ्या नजरेसमोर तो सगळा काळ जातो आहे. सगळ्या कारसेवांमध्ये मी कारसेवक म्हणून आलो होतो. त्यावेळची अयोध्या आठवते आहे. बदायू जेलमध्ये १८ दिवस होतो तो काळही आठवतो आहे. तेव्हाही आमच्या मनात विश्वास होता की जो संघर्ष करतोय त्याला यश मिळेल. आपण हयात असताना हे व्हावं असं वाटायचं. त्याच्या खूप आधी हे मंदिर होतंय याचा विशेष आनंद आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज ते मंदिर इथेच तयार होतं आहे यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो? इथे काम पाहिल्यानंतर इंजिनिअर्स सांगत आहेत की जी तारीख दिली आहे त्या तारखेच्या आधीच हे पूर्ण होईल. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही राम मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *