Breaking News

निवडणूक सर्व्हे म्हणजे निकाल प्रभावित करण्याचा प्रकार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महायुती २२९ जागा जिंकेल हा भारतीय जनता पक्षाचा दावा फाजील आत्मविश्वास दर्शवत आहे. असे सर्व्हे मॅनेज करण्यात भाजपचा हातखंडा असून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. तसेच असे सर्व्हे करून निवडणूकीचे निकाल प्रभावित करण्याचा प्रकार असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
निवडणुका आल्या की आपल्याला हवे तसे सर्व्हे भाजप करुन घेत असते. परंतु अशा सर्व्हेची विश्वासार्हता किती असते हे मागील अनेक वर्षात दिसून आले आहे. काँग्रेसचा पराभव होईल असे अंदाज व्यक्त करण्यात आलेले या आधीचे अनेक सर्व्हे सपशेल खोटे ठरलेले आहेत. परंतु सर्व्हे करुनच निवडणुका जिंकता आल्या असत्या तर निवडणूक आयोगाची गरजच काय? भाजपचे आकडेच खरे मानून निकाल जाहिर करावेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपचा २२९ जागांचा दावा हास्यास्पद असून वस्तुस्थितीशी त्याचा काहीही संबंध नाही. भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेत असून पंधरा वर्षात जेवढे काम झाले नाही त्यापेक्षा जास्त काम पाच वर्षात केल्याचा डांगोरा पिटला जात आहे. भाजपाच्या मते एवढी विकास गंगा राज्यात वाहत आहे तसेच मोठ्या बहुमताची त्यांना खात्री आहे तर मग महाजनादेश यात्रा, जनआशिर्वाद यात्रा काढण्याची गरज का भासावी? प्रत्यक्षात भाजप शिवसेना सरकारच्या विरोधात राज्यात प्रचंड नाराजी असून जनता या सरकारच्या कारभाराला विटलेली आहे. शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणवर्ग, महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक या सर्वांची सरकारने घोर फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला. विकासाच्या नावाने बडवलेले ढोल फुटलेले आहेत. राज्यावर पाच लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा केला आहे. १५ व्या वित्त आयोगानेही राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली असल्याचे स्पष्ट करुन भाजपाच्या विकासाच्या दाव्याची पोलखोल केलेली आहे. प्रगतीच्या बाबतीत एक नंबरवर असलेला महाराष्ट्र पाच वर्षात दिवाळखोरीकडे नेऊन ठेवला आहे. भ्रष्टाचाराने कळस गाठलेला असून कारवाई न करताच क्लीन चिट देऊन टाकण्यात आल्या आहेत. अशा भ्रष्ट, कलंकीत सरकारला महाराष्ट्रातील जनता पुन्हा निवडून देणार नसल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *