Breaking News

राज्यात गुंतवणूकीची गरज मात्र सरकारकडून मोदींच्या प्रतिमा संवर्धनासाठी काश्मीरात रिसॉर्ट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी
महाराष्ट्रातील एमटीडीसी रिसॉर्टची अवस्था अत्यंत दयनीय असून राज्यामध्ये पर्यटन वाढीकरीता अधिक गुंतवणुकीची गरज आहे. मात्र महाराष्ट्राचे हित डावलून महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा मोदी सरकारच्या प्रतिमा संवर्धनाकरीता आणि काश्मीरबाबतचा मोदी सरकारचा निर्णय योग्य ठरविण्याकरीता काश्मीरमध्ये एमटीडीसीचे रिसॉर्ट बांधण्याचा निर्णय घेत जनतेचा पैसा खर्च केला जात असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील भाजप शिवसेनेचे सरकार गेली साडेचार वर्ष महाराष्ट्राचे हित डावलून मोदी सरकारच्या इशा-यावर महाराष्ट्राच्या जनतेचे नुकसान करत आहे. या अगोदरही महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवणे असेल. मुंबई येथे होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये हलवण्याचा निर्णय असेल, महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये व उद्योग प्रकल्प गुजरातला नेण्याचा प्रयत्न असेल किंवा केवळ गुजरातच्या फायद्यासाठी होणारी बुलेट ट्रेन असेल, महाराष्ट्राच्या भाजप शिवसेना सरकारने मोदींच्या इशा-यावरती महाराष्ट्राची कुचंबणा केल्याचा आरोप त्यांनी केला.
परंतु आज महाराष्ट्रावर प्रचंड कर्ज असताना तसेच बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असताना महाराष्ट्रातच अधिक गुंतवणुकीची गरज आहे. इतर क्षेत्राबरोबरच पर्यटन क्षेत्रातही महाराष्ट्र मागे पडला आहे. कोकण असेल वा अन्य विभागात पर्यटन क्षेत्रासाठी अधिक गुंतवणुकीची आवश्यकता असताना राज्यातील जनतेचा पैसा काश्मीरमध्ये खर्च करण्याची आवश्यकता काय? असा संतप्त सवाल ही त्यांनी यावेळी केला.
केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार असताना केंद्राकडून महाराष्ट्रात जास्त गुंतवणूक यावी अशी अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारकडून राज्याचाच निधी स्वतःच्या सत्तेचा दुरुपयोग करून मोदी सरकारच्या स्वार्थाकरिता इतरत्र वळवला जात आहे, हे दुर्देवी आहे. काश्मीरमध्ये ३५ अ व ३७० कलम रद्द केल्यानंतर तिथे खासगी गुंतवणुकीची अपेक्षा आहे, राज्य सरकारांच्या गुंतवणुकीचा नाही. खासगी गुंतवणूकीकरिता कोणी तयार नसल्याने महाराष्ट्र सरकारला तिथे गुंतवणूक करण्याकरिता जबरदस्तीने भाग पाडले जात असल्याचा आरोप करत राज्यातील जनतेने निकराने हा डाव उलथून लावला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *