Breaking News

भुसे-केसरकरांचा खळबळजनक आरोप: नक्षलवाद्यांच्या धमक्या असूनही शिंदेंना सुरक्षा नाकारली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी तेथील नक्षलवाद्यांनी शिंदे यांना मारण्याचा कट आखला. तसेच धमक्याही दिल्या. याची माहिती असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात आली. तसेच त्यांना सुरक्षेची गरज नाही असे उध्दव ठाकरे यांनी सांगितल्याचा खळबळजनक आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी केला. तर पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या माजी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनीही त्यास दुजोरा दिला.

मंत्रालया मागे असलेल्या एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिपक केसरकर आणि दादाजी भुसे यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला सातत्याने गद्दार म्हटले जात असून आमच्या पक्ष निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिवसैनिकांमध्ये आणि मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांच्याकडून केला जात आहे. मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी आम्ही शिवसैनिकच आहोत आणि शिवसेनेविषयीची आमची निष्ठा कायम आहे असा दावाही त्यांनी यावेळी केला.

कितीही शुभ संवाद यात्रा काढल्या तरी जनतेचे आमच्यावरचे प्रेम कमी होणार नाही आणि आम्ही जनतेतूनच निवडून येणार त्यात काहीही अडचण निर्माण येणार नाही असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्याबाबतचा मुद्दा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता असे सांगत दिपक केसरकर यांनी आज सुदैवाने दादा भुसे हे माझ्यासोबत आहे आहेत. तेच आता त्यावेळी काय झाले याची माहिती देतील असे सांगत त्यांनी भुसे यांना बोलण्यास सांगितले.

त्यावर दादाजी भुसे म्हणाले, एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवादांकडून सातत्याने धमक्या येत होत्या. कारण त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात धडक मोहीम राबवली होती. यावेळी शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच त्यावेळी झेड प्लस सुरक्षा देण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती दिली. तत्कालीन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे याबाबत प्रस्तावही पाठवण्यात आला. मात्र शिंदे यांना सुरक्षा देण्याची गरज नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याने सुरक्षा देण्यात आली नसल्याचे सांगितले.

शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आम्ही मिळवणार, परंतु आमच्यासाठी ते महत्त्वाचे नाही कारण जेवढा बाणाला महत्त्व आहे तेवढे धनुष्याला आहे. परंतु शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेना भवन याच्यावर दावा सांगत बसण्यापेक्षा आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी पुढे जात आहोत आणि तीच आमची प्रॉपर्टी आहे बाकी गोष्टी आमच्यासाठी महत्वाच्या नाहीत असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.

आदित्य ठाकरे हे वयाने लहान आहेत आम्ही त्यांच्या आजोबांचा मान राखतो आणि म्हणूनच आदित्य ठाकरे यांना मान देतो. कारण त्यांच्यात बाळासाहेबांचा अंश आहे. मात्र आदित्य ठाकरे यांना प्रादेशिक अस्मिता कळत नाही. त्यासाठी लोकांमध्ये जावे लागते त्यांना भेटावे लागते असा टोला केसरकर यांनी लगावत म्हणाले, त्यांचे जेवढे वय आहे त्यापेक्षा अधिक काम शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी केले आहे. त्यांचा अपमान असा करू नका असे आवाहन करत आदित्य ठाकरे यांनी विविध ठिकाणी जाऊन शिवसैनिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते खरे शिवसैनिक आहेत का? हे तपासावे लागेल कारण खरे शिवसैनिक हे आमच्या सोबत आहेत असेही ते म्हणाले.

दरम्यान, युतीसाठी उध्दव ठाकरे यांनी खरचं देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता का? असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता केसरकर म्हणाले, अनिल परब यांचा फोन तपासा म्हणजे तुम्हाला त्यांच्या फोनमध्ये आढळून येईल असेही सांगितले.

तर दुसऱ्याबाजूला नाशिकमधील शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनीही एकनाथ शिंदे यांना धमक्या येत होत्या. त्यावेळी शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी चर्चा झाली. मात्र उध्दव ठाकरे यांनी शिंदे यांना सुरक्षा देण्यास नकार दिल्याचा आरोपही मनमाड येथील सभेत केला.

Check Also

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *