Breaking News

संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी; वर्षा राऊत यांनाही ईडीचे समन्स चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

तीन दिवसांपूर्वी पत्रावाला चाळ प्रकरणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या मैत्री आणि रिसिडन्स गार्डन या दोन बंगल्यावर ईडीने धाडी टाकत ११ लाख रूपयांची रोकड जप्त केली. त्यानंतर संजय राऊत यांची ईडीने रात्री उशीरापर्यत चौकशी केली. त्यानंतर मध्यरात्रीनंतर संजय राऊत यांना अटक करण्यात आली.अटके नंतर संजय राऊत यांना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पुन्हा त्यांच्या कोठडीत ८ ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावण्यात आली. मात्र संजय राऊत यांच्यापाठोपाठ ईडीने त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही चौकशीसाठी समन्स बजाविल्याची माहिती पुढे येत आहे.

गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला. आता या प्रकरणात ईडी वर्षा राऊतांची चौकशी करणार आहे.
पत्राचाळ गैरव्यवहार असो की अलिबागमधील जमिनीचे व्यवहार असो हे सर्व व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत, असा आरोप ईडीने केला. ईडीने याबाबत सेशन्स कोर्टातही याबाबत कागदपत्रं सादर केली. आता वर्षा राऊत यांच्या खात्यावर अनोळखी लोकांकडून आलेल्या पैशांच्या व्यवहाराची चौकशी होणार आहे. त्यामुळे लवकरच वर्षा राऊत यांनाही ईडी कार्यालयात येऊन चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

दरम्यान, वर्षा राऊत यांची आधीही ४ जानेवारीला ईडीने चौकशी केली होती. ती चौकशी पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली होती. ईडीच्या नोटीशीनंतर राऊत यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून मागितली होती.

‘ईडी’ने आतापर्यंत गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता
‘एचडीआयएल’कडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे ११२ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे दिसून आले होते. ही रक्कम प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली.

यातील एक कोटी सहा लाख ४४ हजार ३७५ रुपये संजय राऊत यांची पत्नी वर्षां राऊत यांना देण्यात आले. त्यातील ५५ लाख रुपये २००९-२०१० मध्ये कर्जाच्या (असुरक्षित) स्वरूपात वर्षां राऊत यांना मिळाले. त्यातून एक सदनिका खरेदी करण्यात आली.

याशिवाय प्रवीण राऊतचे व्यावसायिक संबंध असलेल्या प्रथमेश डेव्हलपर्स यांच्यामार्फत वर्षां राऊत आणि संजय राऊत यांना ३७ लाख ५० हजार रुपयांचा फायदा मिळाला. त्यासाठी वर्षां आणि संजय राऊत यांनी अनुक्रमे १२ लाख ४० हजार व १७ लाख १० रुपये गुंतवणूक केली होती.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *