Breaking News

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही… सोनिया गांधी यांच्या घराभोवती फौजफाटा वाढविला

नॅशनल हेराल्डच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बुधवारी ईडीने हेराल्ड हाऊसमधील यंग इंडिया कंपनीच्या कार्यालयाला सील केले. त्याचबरोबर काँग्रेस मुख्यालयाबरोबरच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घराभोवतीही फौजफाटा वाढविण्यात आला. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आव्हान दिले.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदींना घाबरत नाही, त्यांनी हवं ते करावं मी माझं काम करत राहणार हा सारा प्रकार म्हणजे दबाव टाकण्यासाठी केलेली कारवाई असल्याचे म्हणाले.

‘ईडी’ने मंगळवारी ‘हेराल्ड हाऊस’वर छापे टाकले होते, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी यंग इंडियाचे कार्यालय पूर्वपरवानगीशिवाय न उघडण्याचा आदेशही काढला. ‘हेराल्ड हाऊस’वर झालेल्या कारवाईनंतर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘हेराल्ड हाऊस’सह अकबर रोडवरील काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे ‘दहा जनपथ’ निवासस्थान तसेच, शेजारी असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाभोवती पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली. अकबर रोडच्या लगत असलेल्या सर्व रस्त्यांचीही नाकाबंदी करण्यात आली. काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख व खासदार जयराम रमेश यांनी, काँग्रेस मुख्यालयाला गराडा घातला असून छावणीचे स्वरूप आल्याची टीका केली व पोलिसांच्या नाकाबंदीची चित्रफीतही समाजमाध्यमांतून प्रसारित केली होती. या प्रकरणातील चक्रे वेगाने फिरू लागल्याचे स्पष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत प्रतिक्रिया नोंदवली.

ईडी’च्या कारवाईमुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला. सोनिया गांधींच्या निवासस्थानाभोवती पोलिसांचा फौजफाटा दिसू लागताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पक्षाच्या मुख्यालयात दाखल झाले. त्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे, पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, सलमान खुर्शीद आदी नेत्यांनी बैठक घेऊन केंद्र सरकार व भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी बुधवारी सकाळच्या सत्रात लोकसभेत थेट अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या हौदात येऊन केंद्र सरकारविरोधात निदर्शने करत होत्या. काँग्रेस सातत्याने विरोधी नेत्यांच्या ‘ईडी’ चौकशीविरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी बुधवारी कर्नाटक दौऱ्यावर गेले होते, रात्री उशिरा ते दिल्लीत परत आले.

हा सगळा धमकावण्याचा प्रयत्न आहे. त्यांना वाटतं की थोडा दबाव टाकून हे गप्प बसतील. पण आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा देत पुढे ते म्हणाले, या देशात लोकशाहीविरोधात नरेंद्र मोदी, अमित शाह जे करत आहेत त्याविरोधात आम्ही उभे राहणार. त्यांनी काहीही केलं तरी आम्ही ठामपणे उभे राहणार. आम्हाला काही फरक पडत नाही असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

आम्ही घाबरणाऱ्यांमधले नाही. आम्ही नरेंद्र मोदींना घाबरत नाही. समजलं का? काही फरक पडणार नाही. देशाचं संरक्षण करणं, येथील लोकशाहीचं संरक्षण करणं देशातील ऐक्य जपणं हे माझं काम आहे आणि मी ते करत राहणार, असे म्हणत राहुल यांनी भाजपाला थेट आव्हान दिले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *