Breaking News

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा इशारा, आम्ही पण खूप काही बोलू शकतो… महाराष्ट्राची संस्कृती ती नाही

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अतिशय चुकीचे वक्तव्य केले असून महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. आम्ही पण खूप काही बोलू शकतो, पण आपल्या संस्कृतीचा विचार करुन गप्प बसतो असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित जनता दरबारानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांचे ते वक्तव्य त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही पसंत पडले नसेल. राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना असे नेते काही बोलून जातात आणि माध्यमात तेच दाखवले जाते. त्यामुळे राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी तारतम्य ठेवून वक्तव्य केले पाहिजे. कुठलाही समाज किंवा महिलावर्गाच्या भावना दुखावल्या जातील, असे बोलता कामा नये, असा सल्लाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला.

संभाजी राजेंचे बोलणे झालेले-
विधानसभा सदस्यांद्वारे राज्यसभेचे खासदार निवडण्यासाठीची निवडणूक जवळ येत आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असा अंदाज अजित पवार यांनी वर्तविला. तसेच संभाजीराजे यांनी खासदारकीबाबत सर्वच पक्षांशी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे अधिकची मते नसल्यामुळे आम्ही एकच जागा निवडून आणू शकतो, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर नको-
केंद्रीय यंत्रणा त्यांच्या अधिकारांचा वापर करत कारवाया करत असतात. माझ्याही नातेवाईकांवर मागच्या काळात धाडी टाकल्या होत्या. मंत्री अनिल परब यांच्यावर आज कारवाई सुरु असल्याची माहिती काही लोकांनी दिली. मागे तर काही नेत्यांनी अमक्याचा नंबर, तमक्यावर कारवाई असे सुतोवाच केले होते आणि त्यानंतर त्या – त्या व्यक्तींवर कारवाई झालेली आहे. अशा यंत्रणेमध्ये कुणाचाही हस्तक्षेप न होता पारदर्शकपणे कारवाई केली गेली तर कुणाचाही विरोध नाही. जसे राज्य सरकारच्या अखत्यारीत सीआयडी, ईओडब्ल्यू, लाचलुचपत विभाग आहे. त्यांना माहिती मिळाल्यानंतर ते कारवाई करतात. तसेच केंद्रीय यंत्रणा देखील काम करतात. कायद्यानेच या यंत्रणांना अधिकार दिलेले आहेत. फक्त त्याचा गैरवापर होऊ नये एवढीच माफक अपेक्षा सर्वांची असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऊस संपल्याशिवाय कारखाने बंद नाही
आमचा प्रयत्न शेवटपर्यंत ऊसगळीताला जावा असा आहे. साखर आयुक्त लक्ष ठेवून आहेत. ऊस लागवडीची नोंद कृषी विभाग किंवा कारखान्यात केली गेली असती तर त्याच्यावर सरकारला तात्काळ निर्णय घेता आला असता. सध्या बीड, नांदेड, लातूर, जालना या जिल्ह्यात आणि सातारा येथील अंजिक्यतारा ऊस कारखान्याच्या परिसरात ऊस आहे. ऊस गळीताला जाईपर्यंत कारखाने बंद करु नये असे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

राज्यसभासाठीच्या ५७ पैकी ४१ जागी बिनविरोध निवडणूक; हे उमेदवार आले निवडूण कपिल सिब्बल, पी.चिदमबरम, राजीव शुक्ला आदी विजयी

राज्यसभेतून १५ राज्यांतील ५७ सदस्य निवृत्त झाल्याने त्यासाठी आज मतदान घेण्यात आले. एकूण ५७ जागांपैकी …

Leave a Reply

Your email address will not be published.