Breaking News

चंद्रकांत पाटील म्हणाले, सुप्रिया सुळेंना ग्रामीण भाषेत बोलण्याचा आनंद झाला तिसरी जागाही निवडूण आणू शकतो

भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर प्रदेश भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकेलही असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मुंबईत प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ ध्यानात घेता राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे दोन उमेदवार सहज निवडून येतात. त्याखेरीज अतिरिक्त मतांच्या जोरावर भाजपा तिसरी जागा लढवून जिंकू शकते. या निवडणुकीच्या बाबतीत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेत असल्याने त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई होईल असेही त्यांनी सांगितले.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा एक उमेदवार निवडून येऊ शकत असताना तो पक्ष सहाव्या जागेसाठी दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवत असल्याबद्दल एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

शिवसेनेने या निवडणुकीत काय करावे हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु, राज्यसभा निवडणुकीत प्राधान्यक्रमाच्या मतदानाच्या पद्धतीमुळे दोन उमेदवार लढविण्याच्या प्रयत्नात कधी कधी मूळ उमेदवार पराभूत होतो, हे ध्यानात घ्यावे, असेही ते म्हणाले.

शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीने मारलेल्या छाप्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा संविधानाच्या चौकटीत स्वतंत्रपणे काम करत आहेत. त्याविषयी आपण टिप्पणी करणार नाही.

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई होत नसल्याचे पाहून जयश्री पाटील उच्च न्यायालयात गेल्या. त्यांच्या अर्जाच्या आधारावर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला व कारवाई झाली हे विसरता येणार नाही. न्यायालयाचा दरवाजा सर्वांसाठी खुला आहे. केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाईबाबत शिवसेनेला काही गैर वाटत असेल तर त्यांनी न्यायालयाकडे दाद मागावी असा खोचक सल्लाही त्यांनी शिवसेनेला यावेळी दिला.

तसेच यावेळी त्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत केलेल्या टीकेबाबत सारवा सारव करताना ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार तिहेरी चाचणी पूर्ण करून ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा मिळवत नाही याचा संताप व्यक्त करताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी ग्रामीण पद्धतीने बोललो. ज्या ओबीसी समाजाच्या प्रेमातून हा सात्विक संताप व्यक्त केला, त्यांना त्यामुळे आनंदच झाला. यामध्ये सुप्रिया सुळे किंवा कोणत्याही महिलेचा अनादर करण्याचा मुद्दा नाही. आपण जे मत व्यक्त केले त्याबाबतीत पराचा कावळा करू नये असे आवाहन त्यांनी केले.

काल सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, घरात जा स्वंयपाक करा, मसणात जा कुठे ही जा पण ओबीसींचे आरक्षण आणून द्या असे वक्तव्य केले. त्यावरून सर्वच स्तरातून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठविली गेली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *