Breaking News

राज्यपालांच्या उपस्थितीतच त्यांचीच तक्रार अजित पवारांनी केली पंतप्रधानांकडे मोठ्या व्यक्तींकडून नको ती वक्तव्य केली जातात ती न पटणारी असतात

पुणे मेट्रो आणि १४० ईलेक्ट्रीक बसेससह इतर महत्वाच्या योजनांचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या वादग्रस्त वक्तव्याची तक्रार करत टोला लगावला.

एमआयटी काँलेजच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अजित पवारांनी आज उद्घाटन झालेल्या पुण्यातील प्रकल्पावर समाधान व्यक्त करताना म्हणाले की, पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्या अर्थानं दाद दिली पाहिजे. १० जूनला पुणे महानगर पालिकेने ठराव पास केला होता की आपल्याला मेट्रो हवी. त्यानंतर १२ वर्ष सुरू करायला लागली. मधल्या काळात काही लोकप्रतिनिधींच्या हट्टासाठी ती जमिनीवर करायची की अंडरग्राऊंड यामध्येच बराच वेळ गेला. पण नंतर गडकरींनी कठोर भूमिका स्वीकारली आणि मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना मेट्रोच्या कामामुळे खूप त्रास सहन करावा लागला. अजून काही काळ तो त्रास सहन करावा लागणार आहे असल्याचे स्पष्ट केले.

त्याचबरोबर पंतप्रधानांना मला विनंती करायची आहे, की अजूनही पिंपरी चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज आणि पुण्यातल्या वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खराडी ते स्वारगेट या जोडमार्गांचा अहवाल तयार करायचे काम सुरू आहे. जसे आत्ताच्या मेट्रोमध्ये ५० टक्के केंद्र सरकार, ५० टक्के राज्य सरकारचा निधी आहे, त्याचप्रकारे या बाकीच्या मार्गांसाठी देखील केंद्राची मदत झाली, तर पुणेकरांसाठी मोठं काम होईल अशी विनंती वजा मागणीही त्यांनी यावेळी केली.

पंतप्रधानांच्या लक्षात मी एक बाब आणू इच्छितो. अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत. ती मान्य देखील होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी रयतेचं स्वराज्य स्थापन केले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या उत्तुंग विचारांचा वारसा आपल्याला महाराष्ट्रात पुढे न्यायचा आहे. मनात कुणाच्याही बद्दल आसूया न ठेवता विकास कामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे मी नम्रतापूर्वक सांगतो असे सांगत राज्यपालांचे नाव न घेता अजित पवार यांनी तक्रार केली.

राज्यपालांच्या यावरून वक्तव्यावरून अजित पवारांची तक्रार

चाणक्याशिवाय चंद्रगुप्त मोर्याला कोण विचारत, तसेच समर्थ रामदासांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारले, शिवाजी महाराज म्हणाले होते की तुमच्या कृपेमुळेच राज्य मिळालेय असे वक्तव्य राज्यपालांनी औरंगाबादेतील एका कार्यक्रमात करत एकच खळबळ उडाली. तर सावित्रीबाई फुले यांचे वयाच्या ९ व्या १० व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी लग्न झाले. त्यावेळी त्यांच्या मनात काय भावना निर्माण झाल्या असतील असेही वक्तव्य त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुणे विद्यापीठातील पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी केले.

Check Also

राहुल गांधी यांची २४ एप्रिलला अमरावती व सोलापुरात जाहीर सभा

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघात काँग्रेस नेते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *