Breaking News

काँग्रेसच्या निषेधाचा आवाज आम्ही ऐकलाच नाही काँग्रेसच्या निषेधानंतरही भाजपकडून सवाल

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने भाजपकडून प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्यात येत असून या राजकारणाच्या गोंधळात दहशतवादी आणि नक्षलग्रस्तांच्या कारवायाबद्दल विरोधकांनी काढलेल्या निषेध पत्रकाची खातरजमा न करण्याची तसदी भाजपने घेतली नाही. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निषेध पत्रक काढूनही भाजपकडून मात्र काँग्रेस -राष्ट्रवादी त्यांच्याबाबत गप्प का असा सवाल विचारत स्वतःच्या राजकीय बुध्दीमत्तेचे दिवाळे दाखवून दिले आहे.
नुकतीच जम्मू आणि काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांकडून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यकर्त्याची आणि नक्षलवाद्यांकडून छत्तीसगडमधील भाजप आमदाराची निर्घुण हत्या करण्यात आली. दहशतवादी आणि नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या या कृत्याचा निषेध काँग्रेसकडून निषेध पत्रक काढत करण्यात आला. परंतु भाजपने या विरोधी पक्षांनी निषेधही केला नाही की नींदाही केली नसल्याचे सांगत विरोधक गप्प का असा सवाल उपस्थित केला.
सत्तेवर आल्यास देशद्रोहाच्या गुन्ह्याचे कलम रद्द करू असे जाहीर आश्वासन काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात दिल्यानंतर आणि त्या पक्षाने उघडपणे फुटीरतावाद्यांचे समर्थन केल्यानंतरच जम्मू काश्मीरमध्ये संघ स्वयंसेवकाची दहशतवाद्यांकडून हत्या आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमदाराची हत्या अशा घटना घडल्या आहेत. काँग्रेस पक्ष आणि त्याच्या साथीदारांनी तसेच लोकशाहीसाठी गळा काढणाऱ्या विचारवंतांनी या घटनांचा ठामपणे निषेधसुद्धा केलेला नाही. या घटनाक्रमाचा अर्थ काय, असा प्रश्न भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी बुधवारी विचारला.
ते म्हणाले की, जम्मू काश्मीरचा स्वतंत्र पंतप्रधान असायला हवा, अशी भूमिका घेणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सला काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस व महागठबंधनमधील इतर पक्षांनी साथ दिली आहे. सत्तेत आल्यास देशद्रोहाच्या विरोधातील गुन्ह्याचे कलम काढून टाकण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले. काश्मीरमधील दहशतवादी आणि देशभर विविध ठिकाणी हिंसक कारवाया करणाऱ्या नक्षलवाद्यांना सोईची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काश्मीरी फुटीरतावाद्यांशी चर्चा करू, देशाचे तुकडे होतील म्हणणाऱ्यांना मोकळीक मिळण्यासाठी संबंधित कायदा रद्द करू अशीही काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ला आणि छत्तीसगडमधील नक्षली हल्ला यांच्याबाबत काँग्रेस, त्याचे राष्ट्रवादी काँग्रेससारखे मित्रपक्ष आणि एरवी असहिष्णुता, लोकशाही, घटनात्मक संस्था याविषयी गळे काढणारे विचारवंतही गप्प आहेत, याचा जनतेने काय अर्थ लावायचा ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *