Breaking News

अजित पवार यांची खोचक टीका,.. मुख्यमंत्र्यांची ही फालतूगिरी, अयोध्येतून मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर गेले. याआधी एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाले की, आताच्या ताज्या प्रश्नांवरून लोकांना विचलित करण्याची मुख्यमंत्र्यांची ही फालतुगिरी आहे. आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. अजित पवार यांच्या या खोचक टीकेला अयोध्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तितक्याच जोरकस उत्तर दिले.

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून पवार म्हणाले की, प्रत्येकाला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. तसेच, मुख्यमंत्री हे अयोध्येला रामाच्या दर्शनासाठी गेले आहेत. मात्र, आम्ही कधी इकडे जाणार, तिकडे जाणार असं काही सांगत नाही. जातीचा, धर्माचा वापर माणसांमध्ये फूट पाडण्यात, द्वेष पसरवण्यात कोणी करू नये, एवढीच आमची अपेक्षा आहे असा उपरोधिक टोलाही लगावला.

अजित पवार म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत पाणी न पिता आत्मक्लेश केला हे कुठल्या जाहीर भाषणांमध्ये मी वक्तव्य केलं होतं का? मी केलेले वक्तव्य चुकीचंच होतं. परंतु, घोंगडी बैठकीमध्ये तशा पद्धतीने वाक्य जायला नको होतं त्याबाबत मी आत्मक्लेश केलेला आहे. दरम्यान, तेच तेच काढून बेरोजगारी आणि महागाई कमी होणार आहे का? असा सवाल अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना केला. तसेच आत्ताच्या ताज्या प्रश्नांना डायव्हर्ट करण्याची मुख्यमंत्र्यांची ही फालतुगिरी असल्याची टीकाही त्यांनी केली.

याबाबत अयोध्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, तुम्हाला माहित आहे ना, त्यांना पाणी मागितलं की ते काय देतात असा खोचक टोला अजित पवार यांना लगावत ते आमचे चांगले राजकिय मित्र असल्याचे सांगत अजित पवार यांच्या टीकेवर अधिक बोलण्याचे टाळले. मात्र रामाला माननारी जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असे सांगायलाही मुख्यमंत्री शिंदे विसरले नाहीत.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *