Breaking News

पाटलांचा मुश्रीफांवर पलटवार…. व्हाईट मनी आहे की वर्गणी म्हणून गोळा करणार? धमक्यांना घाबरत नाही, खुशाल चौकशी करा

पुणे : प्रतिनिधी

आरोपामुळे हडबडलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्याला वादात ओढले आहे. आज काल इतके १०० कोटींचे घोटाळे उघडकीस येत आहेत की आता ही रक्कमच शुल्लक वाटू लागली आहे. जर किरीट सोमय्या यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकायचा असेल तर त्यासाठी स्टँम्प ड्युटी भरायला लागणारा व्हाईट मनी आपल्याकडे आहे की वर्गणी म्हणून गोळा करणार आहात ? असा खोचक सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर केला. ते पुणे येथे बोलत होते.

त्याचबरोबर आपण असल्या धमक्यांना घाबरत नाही, रस्ते विकासासाठी आपण राबवलेल्या कल्पक प्रकल्पाची खुशाल चौकशी करा असे आव्हानही त्यांनी मुश्रीफ यांना दिले.

मंत्री हसन मुश्रीफ हे आपल्या आपल्यावरील गुन्हे झाकण्यासाठी खोटे आरोप रचून जनतेची दिशाभूल करत आहेत. जनता सूज्ञ असून दिशाभूल करण्याच्या प्रयत्नांना कधीही यश येणार नाही. हायब्रीड अॅन्युएटीमध्ये घोटाळा झाल्याचे म्हणणे मुश्रीफांचे आहे. पण त्यातूनच तयार झालेल्या रस्त्यांची उद्घाटने सत्ताधारी नेते करत फिरत आहेत. कोरोना काळात फक्त पैसे खाण्याचेच काम या सरकारने केल्याचा आरोप करत रस्त्याच्या बांधकामात कोणताही घोटाळा झाला नाही आणि झाला असेल तर १९ महिने झोपा काढत होतात का? असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

जयंत पाटील, सुप्रिया सुळे आदी नेते रोज उठून म्हणतात की पुढची २५ वर्षे हे सरकार टिकणार आहे, तरीही हसन मुश्रीफ यांनी असे म्हटले आहे की “हा महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे.” तुम्ही जर फेविकॉल लावल्यासारखे एकमेकांना चिकटून बसला आहात तर घाबरण्याचे कारण काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करत ‘सर्वांना समान न्याय’ हे भाजपाचे तत्त्व आहे, त्यामुळे जो जो चुकेल त्यांच्या त्यांच्या विरोधात भाजप आवाज उठवेल असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

किरीट सोमय्या यांनी अभ्यास करून हसन मुश्रीफ यांचा आर्थिक घोटाळा बाहेर काढला व संबंधित यंत्रणांकडे तक्रार केली. आता मुश्रीफ यांनी चौकशीला सामोरे जावे. त्यांनी काही गैर केले नसेल तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही. पण ते धमक्या देत आहेत. त्यांनी किरीट सोमय्या यांना खटला दाखल करण्याची धमकी देतानाच आपल्यालाही वादात ओढले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गेले १९ महिने हसन मुश्रीफ यांना या हॅम प्रकल्पाबद्दल कोणतेच प्रश्न पडले नाहीत. पण त्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार झाल्यानंतर ते रस्ते प्रकल्पाच्या चौकशीबद्दल बोलत असल्याचे ते म्हणाले.

राज्य निवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा व संबंधित पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पुढे चालू करण्याचे ठरवले आहे. या जागा आता खुल्या असल्या तरीही त्या मूळच्या ओबीसींच्या असल्याने भाजपाने सर्व जागांवर ओबीसी उमेदवार दिल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, आडनाव गृहित धरणे चुकीचे आयोगापर्यंत अचुक माहिती पोहचवण्यासाठी संबंधितांना सुचना द्या

नुकतेच ओबीसीच्या इम्पिरियल डेटा गोळा करण्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे कान टोचल्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published.