या सरकारने वेश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. तसेच वेश्यांच्या पैशात डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही, तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तोच शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल, असा टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते गडचिरोलीत मविआ सरकारच्या विरोधात भाजपाने आयोजित केलेल्या महाजनआक्रोश मोर्चात बोलत होते.
या सरकारची नियत काय आहे बघा, केंद्र सरकारने सांगितले कोरोना काळात दुर्दैवाने ज्या भगिनींना वेश्या व्यवसाय करावा लागतो त्यांना मदत करा. त्यांना मदत करण्याची घोषणा केली. आम्हाला वाटले चला एका घटकाला तरी हे मदत करत आहेत, पण हे नालायक निघाले. नांदेडमधील केस आहे, मी परवा हे सभागृहात मांडल्याचे त्यांनी सांगितले.
एका कुठल्यातरी संस्थेला पैसे दिले आणि त्यांनी वेश्यांना द्यायला हवे ते पैसे आपल्या नातेवाईकांमधील लोकांना वाटून टाकले. वेश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही. तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तुम्हाला देखील माहिती आहे. तो शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल. कारण या सरकारमध्ये वेश्यांना द्यायच्या पैशांवर डल्ला मारणारे डल्लेबाज पाहायला मिळतात असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मोदींनी कोरोनाच्या काळात गेली दोन वर्षे आमच्या गरीबांकरिता मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला. हजारो टन अन्नधान्य या महाराष्ट्रात आले. अनेक गोडाऊनमध्ये तांदुळ-गहू सडला, पण मोदींचं नाव होईल म्हणून या सरकारने त्या गरिबांपर्यंत अन्नधान्य देखील पोहचू दिले नाही. जे गरिबाच्या तोंडचा घास काढतात ते सरकार तुम्हाला काय न्याय देणार आहे? त्यामुळे या अन्यायी सरकारच्या विरुद्ध जोपर्यंत आपण हल्लाबोल करत नाही, जोपर्यंत या सरकारच्या विरोधात संघटीत होत नाही, जोपर्यंत हा बुलंद आवाज मुंबईच्या मंत्रालयाला थरथर कापायला लावत नाही तोपर्यंत हे सरकार वठणीवर येणार नाही. म्हणून हा एल्गार आम्ही गडचिरोलीतून सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
