Breaking News

या अशोक चव्हाण- देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागे दडलंय काय? खुलासा फक्त फडणवीसांचा तर चव्हाणांची चुप्पी

काल गुरूवारी राज्यातील भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाली. या भेटीबाबत देवेंद्र फडणवीस यांनीच होय माझी आणि अशोक चव्हाण यांची उभ्या उभ्या भेट झाल्याचे मान्य करत चर्चा मात्र झाली नसल्याचा खुलासा केला. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस नेते यांनीही भेट झाल्याचे एकप्रकारे मान्य केले. मात्र त्याबाबत अधिक खुलासा करण्यास नकार दिला. त्यामुळे या भेटीमागे दडलय काय अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

अशोक चव्हाण यांनी गुरुवारी रात्री उशीरा भाजपाचे पदाधिकारी आशीष कुलकर्णी यांच्या वरळीतील निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यावेळी तेथे चव्हाण यांची फडणवीस यांची भेट झाली. या भेटीमुळे आज राजकीय वर्तुळात अशोक चव्हाण लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला. मात्र, गणपती दर्शनासाठी केवळ योगायोगाने आम्ही एकाच ठिकाणी होतो तेव्हा उभ्या-उभ्या भेट झाली, असा दावा दोघांनी केला. परंतु गेल्या काही महिन्यांतील काँग्रेस अंतर्गत घडामोडी लक्षात घेता अशोक चव्हाण कॉंग्रेसमध्येच राहतील, याची खात्री नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत राज्यात भाजपाच्या मदतीने राज्य सरकार स्थापन केले. त्यानंतर विधानसभेत विश्वासदर्शक ठराव्याच्या आधी शिंदे समर्थक आमदार तथा विद्यमान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी अशोक चव्हाण हे विधानसभेत उशीरा पोहोचले. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे काही आमदारही उशीरा पोहोचले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतच विश्वासदर्शक ठरावाला ज्या अदृष्य हातांनी जी मदत केली त्यांचे आभार मानत अप्रत्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या इतर आमदारांचे आभार मानले होते. त्यानंतर अशोक चव्हाण हे काही समर्थक आमदारांना घेवून भाजपात जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र काल आशिष कुलकर्णी यांच्या निवासस्थानी फडणवीस आणि चव्हाण यांची भेट झाल्याने या चर्चेला एकप्रकारे पुष्टीच मिळत आहे.

आपला राजकीय श्रीगणेशा शिवसेनेतून केलेले आशीष कुलकर्णी हे फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कुलकर्णी हे कॉंग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती होते. मात्र, त्यानंतर कुलकर्णी हे भाजपामध्ये आले. त्यामुळे फडणवीस आणि चव्हाण यांना एकत्र आणण्यात कुलकर्णी हे महत्वाचा दुवा ठरले आहेत.

विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. या पराभवाची पक्षाने चौकशी केली. हंडोरे यांच्या पराभवाच्या संशयाची सुई अशोक चव्हाण यांच्याकडे आहे. अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, चव्हाण यांनी सातत्याने मी काँग्रेस सोडणार या केवळ वावडया आहेत. मी भाजपमध्ये जाणार नाही, असे वेळोवेळी स्पष्ट केले. आताही चव्हाण यांनी मी फडणवीसांशी कोणतीही चर्चा केलेली नाही. रविवारी दिल्लीत काँग्रेसचा मोर्चा असून मी शनिवारी त्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी आज स्पष्ट केले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *