Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीनंतर संजय राऊत म्हणाले, नामर्दपणाला… नामर्द टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर

मराठी ई-बातम्या टीम

राज्याचे मुख्यमंत्री आजारी असताना तुम्ही अत्यंत नामर्दपणे टिका करत होतात. या नामर्दपणाला मुख्यमंत्री आणि जनतेने उत्तर दिले. मुख्यमंत्री स्वतः शिवाजी पार्क येथे आले होते. ज्या कोणी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत नामर्दपणाची वक्तव्ये केली त्यांना चपराक बसली आहे. त्यांच्या अंतर्गत किती घाण आणि कचरा आहे हे स्पष्ट झाले असल्याची टीका शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली असून मी वारंवार सांगत होतो की मुख्यमंत्री येणार आहेत. आजारपण कोणावर येईल सांगता येत नाही. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा अशा गंभीर दुखण्यातून जात होते, तेव्हा आम्ही त्यांची काळजी घेत होतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्याचे दर्शन झाल्याने राज्याची जनता उस्ताहात आणि आनंदात असल्याचेही त्यांनी सांगितले.

आज भारतीय प्रजासत्ताक वर्धापनदिनानिमित्त वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जवळपास अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली.

विरोधी पक्षांनी एकप्रकारची नामर्दानगी आणली आहे. मोठ्या मनाच्या राजकारणाचा विरोधी पक्षांकडून ऱ्हास होत आहे. नामर्दही हा शब्द भाजपाने आणला आहे म्हणून मी तो शब्द वापरत आहे. चंद्रकांत पाटलांची प्रार्थना कोणत्या प्रकारची होती हे सांगायला नको अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रियेनंतर २ डिसेंबरला उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून काम पाहत होते. यावेळी सर्व प्रशासकीय कामे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळाच्या बैठकांना उद्धव ठाकरे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच हजेरी लावली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांनी बोलवलेल्या बैठकीलाही ते गैरहजरी लावल्याने विरोधकांनी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांना जमत नसल्यास त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज तात्पुरता दुसऱ्या नेत्याकडे द्यावा, अशी मागणीही भाजपाच्या नेत्यांनी केली होती.

त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थितीत हजेरी लावल्याने संजय राऊत यांनी विरोधकांवर पलटवार केला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *