Breaking News

पवारांच्या त्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, आमच्याकडून शिकण्यासारखं… कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजपा जिंकेल

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरूण आमदारांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली, त्यावेळी पवारांनी भाजपाच्या आरोपांनी घाबरून जाण्याचे कारण नाही भाजपाला मी काही सत्तेत येवू देणार नाही असे आश्वासक उद्गार काढत तरूण आमदारांना दिलासा दिला. मात्र दुसऱ्याबजाजूला त्यांच्याकडून काहीतरी शिका असा सल्लाही दिला. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेत जो गरजेल तो पडेल काय? असा खोचक सवाल करत शेवटी पवारांनी आमच्याकडे शिकण्यासारखं आहे हे मान्य केल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांच्याकडील खाती काढून घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. मात्र हे तेवढेसे पुरेसे नाही. मलिक यांना त्यांचे मंत्रिपद सोडावेच लागेल असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असून सर्वच समाज घटकांवर अन्याय केला आहे. या सरकारबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे. भारतीय जनता पार्टी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात जनतेचा आदेश मिळवून पोटनिवडणूक जिंकेल, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईत उपोषण केले, त्यावेळी आघाडी सरकारने त्यांना आश्वासने दिली. आघाडी सरकार फसवणूक करेल असा इशारा आपण त्यावेळी दिला होता व आता तसे घडताना दिसत आहे. आघाडी सरकारने मराठा आरक्षण, शिक्षणात सवलत, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना अशा सर्व बाबीत मराठा समाजाची फसवणूक केली आहे. त्याबद्दल समाजात संताप आहे. मराठा समाजाच्या फसवणुकीबद्दल आपण सोमवारी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडणार असून सरकारला प्रश्नांची उत्तरे मागत या विषयावर चर्चा घडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या सरकारने केवळ मराठा समाजाचीच नव्हे तर ओबीसी, अनुसूचित जाती, धनगर अशा इतर समाजघटकांचीही फसवणूक केली आहे. एसटीच्या शंभर कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी या सरकारला पाझर फुटत नाही आणि सरकार एसटीचा संप मिटवत नाही. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय भाजपाच्या दबावामुळे सरकारला स्थगित करावा लागला. तथापि, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. एकूणच या सरकारबद्दल समाजाच्या सर्व घटकांमध्ये नाराजी आहे. या मुद्द्यांवर आम्ही मतदारांमध्ये जागृती घडवू आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेचा आशिर्वाद मिळवू असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने सत्यजित कदम आणि महेश जाधव अशा दोन नावांची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला शिफारस केली असून पक्षातर्फे कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय लवकरच पार्लमेंटरी बोर्डाकडून होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

तसेच राज्यातील राजकिय नेत्यांच्या भाषेबाबत चिंता व्यक्त करत ते म्हणाले, राज्यातल्या राजकिय नेत्यांनी आता बोलण्याची पध्दत बदलली पाहिजे. आम्ही पुढाकार घेतला तर बाकीचे जण म्हणतील तुम्ही कोण? त्यामुळे यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा तसेच राज्यातील चारही प्रमुख पक्षांच्या नेत्यांची बैठक घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

अमोल मिटकरी आणि शहाजीबापू पाटील यांच्यात कलगीतूरा, बारकी पोरंही… टोला प्रति टोल्याने दोघांतील वादांत वाढतेय रंगत

गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published.