Breaking News

राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला “निरोप” तर भाजपाला “नमस्कार” चा संकेत ५ एप्रिलला घेणार अंतिम निर्णय

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत आलेली असताना भाजपाच्या राजकिय हल्ल्यामुळे आणि अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे पिछाडीवर पडत असलेल्या मविआला आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी “निरोपाचा” इशारा तर भाजपाला “नमस्कार” चे संकेत दिले असून ५ एप्रिल रोजी याबाबतचा अंतिम निर्णय घेतला आहे.

गोवा विधानसभेवर भाजपाचा भगवा फडकाविल्यानंतर गोवा प्रभारी तथा राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ साली भाजपाचेच सरकार येणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. त्यातच आता राजू शेट्टी यांनी मविआला निरोपाचा इशारा दिल्याने शेट्टी पुन्हा एकदा भाजपाच्या कळपात सामीन होणार की काय? अशी शंका निर्माण झालेली असतानाच भाजपाचे काही नेत्यांनी शेट्टी यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर संवाद साधत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. या सरकारला अडीच वर्ष होत आली आहेत. महाविकास आघाडी सरकारचे समीक्षण करण्याची आता वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर ही महाविकास आघाडी अस्तित्वात आली, त्या किमान समान कार्यक्रमाचं काय झालं? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राज्य सरकारच्या धोरणामधले अनेक मुद्दे खटकणारे असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,  स्वाभिमानी ही शेतकरी, शेतमजुरांमध्ये काम करणारी संघटना आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच वर्षातल्या धोरणाचं परीक्षण करायचे आहे. अनेक मुद्दे खटकणारे आहेत. अनेक मुद्द्यांबाबत फक्त किमान समान कार्यक्रम म्हटले गेले. पण एखादे नवीन धोरण राबवत असताना महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी संवाद साधण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सामुदायिक निर्णय होता. येत्या ५ एप्रिलला राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यात चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या पाठिंबा देण्यामुळे किंवा न देण्यामुळे सरकारच्या स्थैर्यावर काही परिणाम होणार नाही हे त्यांनाही माहिती आहे. पण महाविकास आघाडीचा नेता निवडताना सूचक म्हणून माझं नाव त्यांना का घ्यावे वाटले? कारण स्वाभिमानीने अनेक वर्षांपासून जे नैतिक अधिष्ठान टिकवले आहे, ते त्यांना सरकारसोबत हवे होते. पण आज धोरणात्मक निर्णय घेताना तुम्ही आम्हाला बेदखल करत असाल, या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत असेल आणि समोरून लोक म्हणत असतील की तुमचे सरकार असून तुम्हाला रस्त्यावर उतरावं का लागतेय? तर यावर आम्हाला चर्चा करणे आवश्यक वाटतंय अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या या भूमिकेचे स्वागत करत भाजपासोबत आल्यास आनंदच वाटेल अशी भूमिका मांडली.

Check Also

देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील

फडणवीस यांचा सवाल, पेट्रोल का महाग? उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले सांगा पेट्रोल डिझेल दरवाढ, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी एल्गार पुकारा

महाराष्ट्रात पेट्रोलवर केंद्र सरकारचा कर १९ रुपये प्रतिलीटर तर राज्याचा कर २९ रुपये आहे. आता …

Leave a Reply

Your email address will not be published.