Breaking News

शरद पवार यांचा सवाल, त्यांची कॅटेगरी कोणती? , तर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ते मोठे नेते ते बोलले… काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात रंगला कलगीतुरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षांतर्गत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आग्रही भूमिका घेतल्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडींवर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच त्यावरून खुद्द शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. आज साताऱ्यात बोलताना शरद पवारांनी केलेल्या खोचक टीकेवर पृथ्वीराज चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या सगळ्याला सुरुवात शरद पवारांच्या राजीनाम्यानंतरच्या चर्चांनी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी “राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाबरोबर प्लॅन बी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया दिली. यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आल्यानंतर त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, काही लोकांची पक्की मतं असतात. ती पक्की मतं असणाऱ्यांपैकी ज्याचं नाव आपण घेतलं ते गृहस्थ आहेत. त्यांचं पक्कं मत असं असतं की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रत्येकवेळी मत व्यक्त करण्याचा प्रश्न आला की, त्यांचं मत आमच्याबाबत प्रतिकूल असतं. त्यामुळे आम्ही त्याची कधी गांभीर्याने नोंद घेत नाही आणि लोक किती गांभीर्याने घेतात हे मला माहिती नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते.

यानंतर आज पुन्हा एकदा साताऱ्यात पत्रकार परिषदेत माध्यमांनी पृथ्वीराज चव्हाणांविषयी विचारणा केली असता शरद पवारांनी सूचक विधान करताना म्हणाले, त्यांनी त्यांच्या पक्षात त्यांचं काय स्थान आहे.. ते ए आहेत, की बी आहेत की सी आहेत की डी आहे ते आधी तपासावं. त्यांच्या पक्षातल्या इतर सहकाऱ्यांना विचारलं की यांची कॅटेगरी कोणती आहे, तर ते तुम्हाला खासगीत सांगतील. जाहीर नाही सांगणार, असा उपरोधिक टोलाही लगावला.
या खोचक टीकेवर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना प्रत्युत्तर दिले. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शरद पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार आहे. ते बोलले तरी मला त्याचं काही वाटत नाही. मी बरंच काही सहन केलेलं आहे. शरद पवारांना वडिलकीच्या नात्याने बोलण्याचा अधिकार आहे, असं यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी मजबूत व्हावी. कुणीतरी मंत्री व्हावं, कुणाला तरी पद मिळावं यासाठी महाविकास आघाडी झालेली नाही. भाजपाचा विषारी विस्तार थांबवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. या प्रयत्नांना कुणीही अपशकुन करू नये, अशी माझी प्रामाणिक भावना आहे, असाही उल्लेख पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *