भारतातील सगळे एकाच बापाची औलाद असून बंगालचे ब्राह्मण आणि उत्तर प्रदेशातील दलित यांचा डीएनए एकच असल्याचे वक्तव्य भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत या डीएनएचा संपूर्ण अभ्यास करून भारतातून लोक कसे युरोपात गेले, मध्यपूर्व युरोपात गेले, आशियात गेले याचे तथ्य समोर आले आहेत. त्यामुळे आर्य-द्रविड ही थिअर संपली आहे. कारण याच डीएनएच्या चाचणीतूनसमोर आलं की भारतात राहणाऱ्या सगळ्यांचा मग ते कोणत्याही जातीचे असो त्यांचा डीएनए एकच असल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवारी (१९ एप्रिल) पुण्यात ‘भाजपा : काल आज आणि उद्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलत होते.
अंदमानचे आदिवासी, बंगालचे ब्राह्मण, दक्षिणेतील नायर आणि उत्तर प्रदेशातील दलित या सर्वांचा डीएनए एकच निघाला. हे सगळे एकाच बापाचे औलाद निघाले. त्यामुळे कोणीतरी आर्य आहे, कोणीतरी द्रविड आहे, कोणीतरी ब्राह्मण आहे, कोणीतरी क्षुद्र आहे हे सर्व संपलं असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
मॅक्स मुलरने आर्य बाहेरून आले होते ही थिअरी या ठिकाणी मांडली. ते प्रतिपादीत करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. याचंही या पुस्तकात उत्तम वर्णन करण्यात आलं आहे. हे खरंच आहे. या देशाला पारतंत्र्यात टाकण्यासाठी भारतीय समाजाचा तेजोभंग करण्यात आला. समाजाचं आत्मभान आणि आत्मतेज हरवतं तेव्हा त्याला गुलाम करता येतं. भारतावर आक्रमण करणाऱ्या प्रत्येकाला हे माहिती होतं. त्यामुळे मुघल असो की इतर कोणतेही आक्रमक असतील त्यांनी राम मंदिरावर, श्रीकृष्ण भूमीवर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले.
ही मंदिरं खंडीत केली कारण त्यांना हे दाखवायचं होतं की तुम्ही ज्यांना ईश्वर मानता त्या ईश्वराला खंडीत करुनही आम्ही तुमच्यावर राज्य करू शकतो. म्हणजे आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, आमचा विचार तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आमचा ईश्वर आणि आमची संस्कृती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी हे हल्ले झाले. अन्यथा ते कोठेही मशिद बांधू शकले असते. खूप जागा होती असे तर्कही त्यांनी यावेळी मांडले.
इतका चांगला ताजमहल बांधू शकतात, तर त्यावेळी जागाच जागा होती. दुसरीकडे त्यांनी मशिद बांधली असती. पण मशिद बांधणं हे त्यांचं उद्दिष्ठ नव्हतं. तेव्हाच्या भारतीय समाजाचा तेजोभंग करायचा हा उद्देश होता. यानंतर इंग्रजांनीही तेच केलं. म्हणून या देशात आर्य बाहेरून आले अशाप्रकारची थिअरी मांडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
यानंतर मध्य युरोपातून आर्य संघर्ष करत आले, त्यावेळी द्रविड या भागात राहत होते आणि आर्यांनी द्रविडांशी लढाई केली, द्रविडांना दक्षिण भारतात टाकलं आणि आर्यांनी हडप्पा आणि मोहनजोदडो संस्कृतीची शहरं तयार केली असा दावा करण्यात आला. म्हणजे ही शहरं युरोपीयन लोकांनी तयार केली, असा प्रयत्न केला. तेच आम्ही अनेक वर्षे शिकत राहिलो. मात्र, आज इतिहासकारांनी संशोधन केलं आणि हे कसं चुकीचं आहे हे आपल्यासमोर आणल्याचेही ते म्हणाले.
अलिकडच्या काळात कार्बन डेटिंगपेक्षा डीएनए टेस्टिंग हा अत्यंत महत्त्वाचा विषय तयार झालाय. या डीएनए चाचणीतून नवी थिअरी समोर आली. त्या थिअरीला जगातील चांगल्या जर्नल्सने स्थान दिलं. ती थिअरी असं सांगते की जगात जी काही मानव जात आहे त्या मानव जातीत सगळ्यात मोठा डीएनएचा हॅप्लो ग्रुप आर१ए१ए (R1A1A) नावाचा आहे. याची सर्वाधिक विविधता भारतात पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
