एका बाजूला भोंगे आहे तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत. भोंग्याच्या विषयावर वाद होता कामा नये. पिढ्यान पिढ्यांपासून मशिदींवर भोंगे असतात. ते उतरण्याची मागणी करण्यापेक्षा राज ठाकरेंना मंदिरावर भोंगे लावयचे असतील तर त्यांनी लावावेत. पण धर्माधर्माध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले य़ांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना दिला.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली असून नागपूरमध्ये बोलताना रामदास आठवलेंनी राज ठाकरेंच्या भूमिकेबाबतही भाष्य केले.
राज ठाकरेंनी त्यांची भूमिका बदलेली आहे. त्यांच्या झेंड्यामध्ये विविध रंग होते. पण त्यांनी आता एकदम कठोर भूमिका घेतली आहे. या कठोर भूमिकेमुळे त्यांना काही राजकीय फायदा होणार नाही. बाळासाहेब असताना त्यांनी अशा प्रकारची मागणी केली नव्हती. त्यांनी दहशतवादी मुस्लिमांना विरोध केला होता. जे हिंदू समाजातून मुस्लिम झाले आहेत त्यांच्याविरोधात भूमिका घेणे योग्य नाही. भोंगे काढण्याचा प्रयत्न कोणीही करु नये. ज्यांना मंदिरांवर भोंगे लावायचे असतील त्यांना तो लावण्याचा अधिकार आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार परवानगी घेऊन भोंगे लावायला काही हरकत नसल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.
राज ठाकरेंच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करुन बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आव्हान देण्याचा प्रयत्न करु नये. भोंगे काढण्यासंदर्भात भाजपाची भूमिका नाही. मंदिरावर भोंगे लावण्याची त्यांची भूमिका असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका सबका साथ सबका विकास अशीच आहे. त्यामुळे भाजपाकडून अशी मागणी केली जाईल असे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
राज ठाकरेंना आधीपासूनच सुरक्षा आहे. मला वाटतं केंद्राने कोणतीही सुरक्षा देण्याची आवश्यकता नाही. पण कोणत्याही नेत्याच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची असते. राज ठाकरेंनी उलट सुलट बोलणे सोडायला हवं असे आवाहनही त्यांनी केले.
हे सरकार पडावं असं मला वाटतं पण ते पडत नाहीये. सरकार त्यावेळेला पडेल जेव्हा शिवसेना भाजपासोबत येईल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत येईल. सरकार पडले तर ते बनवण्याची आमची तयारी आहे. पण ते पडेल अशी शक्यता नाकारता येत नसल्याचेही ते म्हणाले.
