Breaking News

शरद पवार यांच्या मनधरणीसाठी अजित पवार गट पुन्हा चव्हाण प्रतिष्ठानमध्ये प्रफुल पटेल म्हणाले, शरद पवार हे आमचे दैवत, पक्ष एकसंध व मार्गदर्शन घेण्यासाठी आलो

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी रविवारी अजित पवार गटाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी भेट घेतली. त्यानंतर आज विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात अजित पवार समर्थक आमदार सत्ताधारी बाकावर आणि शरद पवार समर्थक आमदार विरोधी बाकावर बसल्याचे दिसून येत होते. मात्र एकाच पक्षाचे आमदार सत्ताधारी आणि विरोधी बाकावर बसल्याने कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आज पुन्हा अजित पवार गटाचे सर्व मंत्री, नेते आणि आमदारांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांच्या भेटीसाठी आले. आज जवळपास पावनेदोन तास अजित पवार यांचा गट शरद पवार यांना आपली भूमिका समजावून सांगत होता. मात्र त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले असून त्यानुसार दोन प्रतोद, दोन विधिमंडळ गटनेते आणि इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती दोन्ही गटांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गट व शिंदे गटाप्रमाणेच सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती झाली आहे.

२०१९मध्ये अजित पवारांनी अशाच प्रकारे देवेंद्र फडणवीसांबरोबर सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, ८० तासांचं सरकार निभावून अजित पवारांनी राजीनामा दिला आणि ते पुन्हा स्वगृही अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी अजित पवारांसह सर्व मंत्र्यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीचे अर्थ काढले जात असतानाच आज दुसरी मोठी बैठक झाली.

आज अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदारांनी वाय. बी. चव्हाण सेंटरवर भेट घेतली. यावेळी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरेही उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय? यासंदर्भात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीनंतर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.

यावेळी प्रफुल पटेल म्हणाले, आज अजित पवार व विधिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी वाय बी चव्हाण सेंटरला आले होते. आम्ही सगळे इथे आलो. काल अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी इथे आलो होतो. काल रविवार असल्यामुळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज विधिमंडळाचं अधिवेशन चालू झाल्यामुळे बरेच आमदार आज इथे हजर होते. त्यामुळे आमदारांना शरद पवारांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही इथे आलो, असं सांगितले.

पुढे बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, आम्ही माहिती काढली की शरद पवार चव्हाण सेंटरला दुपारी येणार आहेत. म्हणून आम्ही इथे आलो. सर्व आमदारांनी शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेतला. काल मी म्हणालो तशीच पक्ष एकसंघ राहण्यासंदर्भात आम्ही शरद पवारांना विनंती केली. शरद पवारांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. आता त्यांच्या मनात काय आहे हे आम्ही कसं सांगू शकणार? असंही सांगितले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *