Breaking News

पंतप्रधान मोदी यांनी कौतुक करूनही शेतकऱ्याने केली आत्महत्या अकोल्यातील घटनेवरून अशोक चव्हाण यांची भाजप सरकारवर टीका

मुंबई: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मधून जाहीर कौतुक केलेले शेतकरी मुरलीधर राऊत यांच्यावर राज्यातील फडणवीस सरकारच्या अनास्थेमुळे आत्महत्येची वेळ यावी, हा प्रकार भाजप सरकारसाठी लज्जास्पद असल्याची संतप्त टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. यातून सरकारची शेतकऱ्यांप्रती निष्क्रियता आणि उदासीनता चव्हाट्यावर आल्याचा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रीय महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्यामुळे काल अकोला जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन केले होते. या ६ शेतकऱ्यांपैकी एक जण हा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलेले शेतकरी मुरलीधर राऊत यांचा समावेश आहे.
त्या सहा शेतकऱ्यांपैकी मुरलीधर राऊत यांचे अकोला-बाळापूर मार्गावर ‘मराठा’ नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर रात्री ट्रॅव्हल्स जेवणासाठी थांबतात. नोटबंदीच्या काळात रोख रक्कमेची आणि सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण झाल्याने प्रवाशांकडे जेवायलाही पैसे नसायचे. त्या काळात मुरलीधर राऊत यांनी प्रवाशांसाठी विनाशुल्क जेवणाची व्यवस्था केली होती. सामाजिक जाणिवेतून त्यांनी केलेल्या या कामाचे खुद्द पंतप्रधानांनीच ‘मन की बात’मधून जाहीर कौतुक केल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
मोदींनी प्रशंसोद्गार काढलेले राऊत यांच्या मालकीच्या ‘मराठा’ हॉटेलची जागा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात संपादित झाली. त्या जागेला अतिशय अल्प मोबदला मिळाल्याने मुरलीधर राऊत सरकारकडे पाठपुरावा करीत होते. हीच तक्रार घेऊन इतरही अनेक शेतकरी सातत्याने प्रशासनाकडे दाद मागत होते. त्यामध्ये २०१७ मध्ये आत्महत्या करणारे शेतकरी भारत टकले यांची पत्नी अर्चना टकले यांचाही समावेश होता. त्यांनीही काल सरकारच्या अनास्थेला कंटाळून विष प्राशन केले आहे. गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याशी लागेबांधे असलेल्या लोकांना घसघशीत मोबदला दिला जात असताना इतरांना तुटपुंजा मोबदला का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यासंदर्भात बोलताना अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज अकोला जिल्ह्यात दाखल होते आहे. मात्र, त्यापूर्वीच घडलेली ही घटना भाजप-शिवसेना सरकारच्या तमाम दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. हे सरकार शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केल्याचा दावा करते. पण दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री जिल्ह्यात येत असताना या शेतकऱ्यांना त्यांच्याकडे दादही मागाविशी वाटू नये आणि त्यांनी हतबल होऊन आत्महत्येचा प्रयत्न करावा, यातून सरकारचा दावा फोल असल्याचे स्पष्ट होते. थोडी जरी संवेदना शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत या शेतकऱ्यांची भेट घेऊन क्षमा मागावी आणि त्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही केली.
पंतप्रधानांनी जाहीर प्रशंसोद्गार काढलेल्या मुरलीधऱ राऊत यांच्यासारख्या शेतकऱ्याची भाजप सरकारच्या काळात दखल घेतली जात नाही. दीड वर्षांपूर्वी आत्महत्या करणाऱ्या भारत टकले यांच्या कुटुंबाला संपूर्ण आधार दिला जात नाही. उलट सरकारी अनास्थेमुळे त्यांच्या पत्नीवरही विष प्राशन करण्याची वेळ ओढवते, हे संतापदायक असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *