Breaking News

राज्यात भयंकरस्थिती तर मुख्यमंत्री मत मागतायत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य सचिव अजोय मेहता यांची भेट

मुंबई: प्रतिनिधी
गेल्या पाच सहा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे भयंकर पूरस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक गावेच्या गावे, घरे, संसार, शाळा, कॉलेजेस, रस्ते सर्वच उध्वस्त झालेले आहे. सगळीकडे पाणीच पाणी साचल्याने महाराष्ट्रातील जनता भयभीत झालेली आहे. महाभयंकर परिस्थिती ओढवली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पनवेल, संपूर्ण कोकण, नाशिक, पुणे, बदलापूर, कल्याण, सांगली, कोल्हापूर अशा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अशा बिकट परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे शासकीय खर्चाने पंचतारांकित प्रचार यात्रा करत फिरत आहेत. ‘महाजनादेश’ यात्रेतून मतदानाची भीक मागत फिरत आहेत. तसेच मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख हे देखील गायब झालेले आहेत. हे दोघे ही कुठेच महाराष्ट्रातील जनतेची मदत करताना दिसत नाही आहे, म्हणून आम्ही मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन कार्यकारी समितीचे प्रमुख या नात्याने श्री अजोय मेहता यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधात काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र राज्यातील अभूतपूर्व पुरआपत्ती बाबत राष्ट्रीय आपदा प्रतिबंधक कायदा – २००५ च्या कलम ६० (बी) प्रमाणे नोटीस बजावत आहोत, अशी माहिती नाना पटोले, प्रचार प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी दिली. नाना पटोले यांच्यासोबत काँग्रेसच्या शिष्टमंडळात मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड, आमदार वर्षा गायकवाड, माजी आमदार चरण सिंग सप्रा, अशोक भाऊ जाधव, मधू चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ संजय लाखे पाटील आणि देवानंद पवार, मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष वीरेंद्र बक्षी आणि अनुसूचित जाती जमाती विभाग अध्यक्ष कचरू यादव सहभागी झाले होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की महाराष्ट्र राज्याला नैसर्गिक आपत्तीच्या संकटात वाऱ्यावर सोडल्याने आणि कर्तव्यात कसूर केल्याची जबाबदारी निश्चित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर तातडीने कारवाई करावी. नोटीस दिल्यानंतर ३० दिवसाची मुदत संपल्यावर मुख्य सचिव अजोय मेहता यांनी योग्य कार्यवाही न केल्यास आम्ही मुख्यमंत्री, पुनर्वसन मंत्री, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत. विजेचा शॉक लागून २ जण मुंबईत दगावले आहेत तसेच अनेक लोक वाहून जाऊन मृत्युमुखी पडलेले आहेत त्यामुळे आम्ही ३०२ चा गुन्हा देखील दाखल करू. मी मोबाईल वरून सर्वांशी संपर्कात आहे. असे सांगणारे मुख्यमंत्री आता मोबाईल वरून महाराष्ट्र राज्य चालवणार आहेत का ? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केल.
मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड यावेळी म्हणाले की आम्ही नोटीस तर बजावलेलीच आहे. परंतु आम्ही काही मागण्या ही मुख्य सचिवांकडे केलेल्या आहेत त्या म्हणजे महाराष्ट्रात जिथे जिथे पूर परिस्थिती आहे, नैसर्गिक आपत्ती आहे तेथील आपत्तीग्रस्त नागरिकांना NDRF व SDRF च्या फंडातून तात्काळ वैधानिक मदत करावी. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आपत्ती निवारण INPUT ASSISTANCE मधील निर्णयाप्रमाने पुरामध्ये मेलेले, वाहून गेलेले, जखमी झालेले, व्यक्ती, घरे, शेती तसेच जनावरे यांचे तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत करावी. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम आणि कार्यक्षम करावी आणि ती दिवसरात्र ३६५ दिवस कार्यरत असावी. महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील पुरबाधित जनतेला तातडीने सर्वतोपरी मदत करावी. त्यामध्ये दिरंगाई करू नये. मुख्यमंत्री आणि पुनर्वसन मंत्री यांनी स्वतः याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. निष्काळजीपणा करू नये, असे एकनाथ गायकवाड म्हणाले.

Check Also

विविध घोटाळ्यांची चौकशी करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील अनेक भरती घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय (CBI) अधिकाऱ्याचा जम्मूमध्ये अपघाती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *