Breaking News

आदिवासी विभागातील साहित्य खरेदीत करोडो रुपयांचा घोटाळा उच्चस्तरीय चौकशी करून घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची वडेट्टीवारांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठीच्या साहित्य खरेदीत घोटाळा करुन राज्याची जवळपास ६० ते ७० कोटी रुपयांची लूट केली आहे, असा आरोप करुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
राज्यातील ५०२ आश्रमशाळामधील २ लाख विद्यार्थी तसेच वसतीगृहातील ५८ हजार विद्यार्थ्यासाठी फर्निचर खरेदीसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. अमरावती, नागपूर, ठाणे आणि नाशिक विभागासाठी ३४५ कोटी रुपयांच्या साहित्य खरेदीसाठी ही निविदा होती.यातून अमरावती व नागपूर विभागासाठी स्पेसवूड कंपनी तर नाशिक, ठाणे विभागासाठी गोदरेज कंपनीच्या निविदा स्विकारण्यात आल्या. अमरावती, नागपूर विभागासाठी स्पेसवूड कंपनीने ज्या दर्जाच्या वस्तू ज्या दरात दिल्या त्याच दर्जाच्या वस्तू गोदरेजने जवळपास दुप्पट किंमतीला दिल्या. निविदा प्रक्रियेनुसार सर्वात कमी किंमत असलेल्या कंपनीच्या निविदा स्विकारण्यात आल्या. परंतु स्पेसवूड कंपनीच्या दरापेक्षा दुप्पट किमतीच्या पुरवठादाराला नाशिक, ठाणे विभागातील काम कसे देण्यात आले ? यामागे कोणाचे अर्थिक हित साधण्याचा प्रयत्न झाला ? याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
आश्रमशाळांना पुरवण्यात येणाऱ्या फर्निचरमध्ये लोखंडी बेड, खूर्च्या, टेबल यासारखे साहित्य होते. अमरावती विभागासाठी स्पेसवूडचा लोखंडी बेडचा दर ५७३४ रुपये असताना त्याच बेडचा गोदरेजचा नाशिकसाठीचा दर ११ हजार रुपये आहे. अमरावतीसाठी स्पेसवूड एक खूर्ची २६७८ रुपये दराने पुरवठा करणार असताना ठाण्यासाठी गोदरेजचा दर मात्र ६ हजार रुपये आहे. तसेच एका स्टिल टेबलचा अमरावतीसाठी स्पेसवूडचा दर ६२५३ रुपये असताना गोदरेजचा नाशिकसाठीचा दर ९४५५ रुपये आहे. एका मिटींग टेबलचा अमरावतीसाठीचा स्पेसवूडचा दर २३ हजार रुपये असताना नाशिकमध्ये मात्र गोदरेजचा तोच दर ३४ हजार रुपये आहे. दोन निविदांमध्ये एवढी तफावत असताना सर्वात कमी किमतीचा निकष गोदरेजच्याबाबतीत कसा काय दुर्लक्षित करण्यात आला असा सवालही त्यांनी केली.
या निविदा प्रक्रियेवेळी विधी व न्याय विभागाचा सल्ला घेताना गोदरेज व स्पेसवूडच्या किंमतीतील तफावत निदर्शनाला आणून देण्यात आली नाही. वास्तविक पाहता अमरावती, नागपूर विभागासाठी स्पेसवूडने पुरवलेल्या वस्तूंच्या दरांपेक्षा नाशिक, ठाणे विभागासाठी पुरवठा करणाऱ्या गोदरेजच्या किंमती ७५ ते १०० टक्के जादा दराच्या होत्या ही बाब विधी व न्याय विभागाच्या निदर्शनाला आणून दिलेली नाही. ठाणे, नाशिक विभागासाठी अमरावतीच्या पुरवठादाराच्या दरातच गोदरेजकडून साहित्य खरेदी करणे अपेक्षित होते. कारण अमरावतीच्या पुरवठादाराच्या किमती गोदरेजपेक्षा कमी होत्या. परंतु गोदरेजच्या ७० ते १०० टक्के जादा दराची निविदा का स्विकारण्यात आली किंवा ठाणे, नाशिक विभागासाठी फेरनिविदा का काढली नाही, असा सवाल उपस्थित करत गोदरेजला दिलेले काम रद्द करुन फेरनिविदा काढावी, अशी मागणी त्यांनी केली.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *