Breaking News

काँग्रेस नेते-मंत्री करणार मोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. मागील सात वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करुन टाकला आहे. काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षात देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठमानेने उभे केले त्याची पुरती वाताहात लावून देश रसातळाला नेला. मोदींच्या सात वर्षातील या काळ्या कारभाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस उद्या रविवारी राज्यभर आंदोलन करत मोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल करणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

वर्षाला दोन कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, काळा पैसा भारतात आणणार, १०० दिवसात महागाई कमी करणार, ‘ना खाऊंगा ना खाणे दूँगा’ म्हणत देशाची ‘चौकीदारी’ करण्याची भलीमोठी आश्वासने देत नरेंद्र मोदी सत्तेवर आले. पण सात वर्षानंतरही मोदींनी दिलेल्या आश्वासनातील एकही ते पूर्ण करु शकले नाहीत. सात वर्षात महागाई एवढी वाढली की लोकांचे जगणे मुश्कील झाले, नोटाबंदीने देशातील छोटे, मध्यम, लघु उद्योग बंद पडले, बेरोजगारी प्रचंड वाढली. काळे कायदे आणून शेतकरी व कामगार देशोधडीला लावले. बँका, रेल्वे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उद्योगपती मित्रांना विकल्या, समाजा-समाजात भांडणे लावण्याचे उद्योग केले. मोदींच्या राज्यात समाजातील एकही घटक समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींच्या या जुलमी, अहंकारी, हुकुमशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी उद्या रविवारी ३० मे रोजी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असून जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मोदी सरकार विरोधात काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहे. मोदी सरकारच्या सात वर्षाच्या कार्यकाळात देशात काळोखच पसरला आहे. काळे कायदे आणले गेले, याचे निदर्शक म्हणून काळे झेंडे दाखवले जातील. निदर्शनाच्या ठिकाणी प्रतिकात्मक सात पुतळे ठेवले जातील. तसेच राज्यातील प्रत्येक विभागात काँग्रेसचे वरिष्ठ नेते, मंत्री पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल करतील. मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पुणे येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नाशिकमध्ये विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नागपूरमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत, अमरावती येथे मंत्री विजय वडेट्टीवार, लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कोल्हापूरमध्ये गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत. तर खा. कुमार केतकर मोदी सरकारच्या सात वर्षाचे अपयश ऑनलाईन व्याख्यानातून उघड करतील. कोरोनासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सुचना व नियमांचे पालून करून हे आंदोलन केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Check Also

सहकारी संस्थांच्या बैठक मुदतवाढीसह हे प्रमुख निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ओबीसींच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा पाठविणार

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासंबधी काढवयाच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *