Breaking News

१६ महिन्यात तब्बल १५५ कोटी रूपयांचा ठाकरे सरकारने केला प्रसिध्दीवर खर्च माहिती अधिकारात उघडकीस

मुंबई: प्रतिनिधी

एकाबाजूला कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत महसूलाची वाणवा असल्याने अनेक योजनांच्या खर्चावर राज्य सरकारकडूनच मर्यादा आणण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने मागील १६ महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल १५५ कोटी खर्च केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारांतर्गत उघडकीस आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंदर्भात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे माहिती अधिकारात माहिती मागविली होती. त्यावेळी वरील माहिती पुढे आली.

१५५ कोटी रूपयांमध्ये सर्वाधिक खर्च हा अर्थात जवळपास ५.९९ कोटी रुपये सोशल मीडियावर खर्च केले. तर सरासरी प्रत्येक महिन्याला प्रसिद्धी मोहिमेवर ९.६ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आल्याचे उघडकीस आली. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून आजमितीला प्रसिद्धी मोहिमेवर करण्यात आलेल्या विविध खर्चाची माहिती मागितली होती. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अनिल गलगली यांस ११ डिसेंबर २०१९ पासून १२ मार्च २०२१ या १६ महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर केलेल्या खर्चाची माहिती उपलब्ध करुन दिली. यात २०१९ मध्ये २०.३१ कोटी खर्च करण्यात आले असून नियमित लसीकरण प्रचारावर सर्वाधिक १९.९२ कोटींचा खर्च असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्ष २०२० मध्ये एकूण २६ विभागाच्या प्रसिद्धी मोहिमेवर एकूण १०४.५५ कोटी खर्च करण्यात आले. यात महिला दिनानिमित्त प्रसिद्धी मोहिमेवर ५.९६ कोटी खर्च करण्यात आले आहे. पदुम विभाग ९.९९ कोटी, राष्ट्रीय आरोग्य अभियानावर १९.९२ कोटी, विशेष प्रसिद्धी मोहिमेवर ४ टप्प्यात २२.६५ कोटी खर्च करण्यात आले आहे. यात १.१५ कोटींचा खर्च सोशल मीडियावर दर्शविला आहे. महाराष्ट्र नागरी विकास अभियानावर ३ टप्प्यात ६.४९ कोटी खर्च करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने निसर्ग चक्रीवादळावर ९.४२ कोटी खर्च केले असून यात२.२५ कोटींचा सोशल मीडियावर दर्शविला आहे. राज्य आरोग्य शिक्षण विभागाने १८.६३ कोटी खर्च केले आहे.  शिवभोजन थाळीच्या प्रसिद्धी मोहिमेवर २०.६५ लाख खर्च केला असून ५ लाखांचा खर्च सोशल मीडियावर दर्शविला असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्ष २०२१ मध्ये १२ विभागाने २९.७९ कोटींचा खर्च १२ मार्च २०२१ पर्यंत केला आहे. यात परत एकदा राज्य आरोग्य शिक्षण विभागाने १५.९४ कोटी खर्च केले आहे. जल जीवन मिशनच्या प्रसिद्धी मोहिमेवर १.८८ कोटी खर्च केले असून ४५ लाखांचा सोशल मीडियावर खपविला आहे. महिला व बाल विकास विभागाने २.४५ कोटींच्या खर्चात २० लाख सोशल मीडियाचा खर्च दाखविला आहे. अल्पसंख्याक विभागाने तर कहर करत ५० लाखांपैकी ४८ लाख सोशल मीडियावर खर्च करुन टाकले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ३.१५ कोटींच्या खर्चात ७५ लाख सोशल मीडियावर खर्च केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे 100 टक्के माहिती उपलब्ध नसल्याने ही आकडेवारी अधिक होऊ शकते. सोशल मीडियाच्या नावाखाली केलेला खर्च संशयास्पद आहे. त्याचशिवाय क्रिएटिव्हच्या नावाखाली दाखविलेल्या खर्चाचा हिशोब वेगवेगळया शंकांना वाव देत आहे. विभाग स्तरावर केलेला खर्च, खर्चाचे स्वरुप आणि लाभार्थीचे नाव संकेतस्थळावर शासनाने अपलोड करावे, अशी मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केली.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

One comment

  1. PM नदामो का पिच्चले 16 महिनेका जाहिरात पर कितना खर्चा किया ये भी तो बतावो। वो आपणे नही बाताया लागता है आप bjp के रखेहुये हो।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *