Breaking News

माजी एनसीबी संचालक समीर वानखेडेंवर “या” गुन्ह्याखाली ठाण्यात गुन्हा दाखल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल

मराठी ई-बातम्या टीम

बॉलीवूड स्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावरील कारवाईमु‌ळे चर्चेत आलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात काल गुन्हा नोंदविला. सदगुरू परमीट रूम आणि बार हॉटेलचा परवाना घेताना कमी वय असतानाही खोटे दस्तावेज तयार करून परवाना घेतल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

समीर वानखेडे यांच्या विरोधात आयपीसी १८६० खाली कलम १८१, १८८, ४२०, ४६५, ४६८, ४७१ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समीर वानखेडे यांच्याविरोधात फसवणुकीबरोबरच इतरही गुन्हे दाखल करण्यात आले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन हॉटेलचा परवाना घेतल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

आरोपांनुसार, १९९६-९७ मध्ये वय १८ पेक्षा कमी असल्याने करार करण्यास पात्र नसतानाही समीर वानखेडेंनी ठाण्यातील सदगुरू बार आणि रेस्तराँच्या करारनाम्यात स्टॅम्प पेपरवर आपलं वय लपवलं होते. याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्याने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी २ फेब्रुवारीला समीर वानखेडेंच्या मालकीच्या सद्गुरु बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द केला. विशेष म्हणजे नवाब मलिक यांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. वानखेडे यांनी आपलं वय चुकीचं दाखवल्याचा ठपका ठेवत हा परवाना रद्द करण्यात आला होता.

समीर वानखेडे यांच्या नावे बार आणि रेस्तराँचा जो परवाना होता ते सद्गुरु बार आणि रेस्तराँ नवी मुंबईमधील वाशी येथे आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सजगुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे होता. हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच मध्यंतरी हा परवाना रिन्यू करण्यात आला होता. आता परवाना रद्द केला असला तरी तो ३१ मार्च २०२२ पर्यंतच पात्र होता. म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिने आधीच परवाना रद्द केला असून आता या कारवाईमुळे परवाना रिन्यू करता येणार नाही. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील हा परवाना होता.

दरम्यान, काही महिन्यापूर्वी समीर वानखेडे यांनी खोटे जात प्रमाणपत्र सादर करत आयआरएस पदाची नोकरी मिळविल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुजवर केलेली कारवाई ही प्लॅनटेड कारवाई होती आणि केवळ शाहरूख खान याच्या मुलाला अडकविण्यासाठी केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसेच आर्यन खानला अटक केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर खंडणी वसुल करण्यात आल्याची माहितीही पुढे आली होती. त्यानंतर कमी वयात असताना त्यांनी परदेशी आणि देशी दारू विक्रीचा परवाना घेतल्याची माहिती उघडकीस आली होती.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *