Breaking News

सोमय्यांचे पुन्हा आव्हान, आम्ही बाप-बेटे हजार वेळा तुरूंगात जावू पण तुम्ही पाठवणार का? मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर पुन्हा निशाना

मराठी ई-बातम्या टीम

मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे संजय राऊत आणि भाजपा आमदारा किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचा सामना चांगलाच रंगलेला दिसून येत आहे. त्यातच किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी सोमय्यांना समन्स बजावित चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले. त्यानुसार सोमय्या हे सांताक्रुज पोलिस ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांची जवळपास ४५ मिनिटाहून अधिक काळ पोलिसांनी चौकशी केल्याचे समजते.

त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले की, एकाबाजूला मी संजय राऊत आणि त्यांचे पार्टनर पाटकर यांचा घोटाळा बाहेर काढूनही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही. मात्र मी छगन भुजबळ यांची मालमत्ता पाहिली म्हणून मला समन्स पाठवून माझ्यावर गुन्हा दाखल करत त्याची प्रत मला दिली जाते. ठाकरे महाशय ते तुमचे प्रवक्ता संजय राऊत बाप, बेटे जेलमध्ये जातील असं सांगत आहे. आम्ही हजार वेळा जेलमध्ये जाऊ. यासाठी आम्हाला जेलमध्ये पाठवणार आहात का? असा सवाल करत आम्ही हजारवेळा तुरूंगात जावू पण महाराष्ट्र घोटाळामुक्त करू असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिला.

भुजबळांची १०० कोटींची संपत्तीविषयी मी हायकोर्टात याचिका केली होती. त्यामुळे भुजबळ दोन वर्षे तुरूंगात जाऊन आले. ४ सप्टेंबरला ती संपत्ती बेनामी घोषित करुन जप्त करण्यात आली. त्याच्या पाहणीसाठी गेलो होतो आणि त्यासाठी उद्धव ठाकरे मला जेलमध्ये पाठवत आहेत. पण मी अशा धमक्यांना घाबरत नाही. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांनी जी संपत्ती जमा केली आहे ती जप्त करुन जनतेला देणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी करताना करोना नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप सोमय्यांना समन्स बजावण्यात आलेला नसून एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

पोलिसांनी एफआयआरची प्रत मला देणे ही हास्यास्पद बाब आहे. छगन भुजबळांची १०० कोटींची बेनामी संपत्ती पाहण्यासाठी मी गेलो होतो, हा गुन्हा आहे. त्यांच्या बेनामी संपत्तीचा घोटाळा मी उघड केला होता. त्यानंतर भुजबळ २ वर्ष तुरुंगात गेले. ती प्रॉपर्टी मी मीडियाला सोबत घेऊन बघायला गेलो, ते त्यांना दिसलं, त्यामुळे भुजबळांच्या दबावामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्याला तुरुंगात टाकू, असो उद्धव ठाकरे म्हणाले होते. आज त्यांनी एफआयआरची प्रत दिली आहे, पुढच्या काही दिवसांत कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेईल असे सांगत घोटाळा करणारे संजय राऊत आणि त्यांचा पार्टनर सुजीत पाटकरविरोधात गुन्हा दाखल होत नाही, परंतु मी १०० कोटींची बेनामी संपत्ती मीडियाला दाखवली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतोय अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.

गेल्या १० दिवसांपासून शिवसेना माझ्यावर आरोप करत नौटंकी करत आहे. पण कोणत्याच गुन्ह्याबद्दल ते एक कागद पुरावा म्हणून देऊ शकलेले नाही आणि रोज रंगीत तालिम सुरू आहे, अशी टीका त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता करत मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही आणि अजित पवार मुख्यमंत्र्यांसारखे वावरतात, मग ते लाइफलाईनवर गुन्हा दाखल का करत नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे आणि अजित पवार राज्याला लुटत असताना मी शांत बसणार नाही. शिवीगाळ सोडा, उद्धव ठाकरेंनी हजार वेळा जरी तुरुंगात टाकलं तरी मी घोटाळामुक्त महाराष्ट्र करून दाखवणार असा निर्धार व्यक्त करत मी पैसे लाटल्याचा आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे, त्यासंदर्भात मी उद्या पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी त्यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी येणार असल्याबाबत विचारले असता सोमय्यांनी खोचकपणे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची परवानगी घेतली का? असा सवाल केला.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *