Breaking News

क्रिकेटपटू युवराज सिंग याच्याविरोधात एससी-एसटी अॅक्ट खाली गुन्हा इन्टाग्रामवर भंगी शब्दप्रयोग केल्याप्रकरणी

मराठी ई-बातम्या टीम

प्रसिध्द क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी इन्टाग्रामवरील त्याच्याच एका व्हिडिओ पोस्टमध्ये भंगी असा जातीवाचक शब्दप्रयोग केल्याप्रकरणी पंजाबमध्ये त्याच्या वर आयपीसी कलम १५३ ए आणि १५३ बी आणि एससी-एसटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्याच्यावरील आयपीसी अन्वये दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द केले आहेत. मात्र एससी-एसटी अॅक्ट अंतर्गत नोंदविण्यात आलेले गुन्हे कायम ठेवले.

या दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या विरोधात युवराज सिंग याने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुणावनी वेळी न्यायालयाने वरील निकाल दिला.

क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि युवराज सिंग या दोघांनी मिळून इन्स्टाग्रामवरील एका पोस्ट केली. त्यामध्ये भारतीय क्रिकेट टीममधील स्पिनर युझवेंद्र चहल याला उद्देशून भंगी असा शब्द प्रयोग केला. त्यामुळे युवराज सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सुणावनी झाली. त्यावेळी न्यायामुर्ती अमोल रतन सिंग यांनी युवराज सिंग याच्यावर लावण्यात आलेले आयपीसी कलम रद्दबातल ठरविले. मात्र एससी-एसटी कायद्याखाली दाखल करण्यात आलेले गुन्हे मात्र रद्द करण्यास नकार देत ते गुन्हे तसेच कायम ठेवले.

यावेळी युवराज सिंग यांच्या वकीलाने न्यायालयात बाजू मांडताना म्हणाले की, युवराज सिंग याने जाणिवपूर्णक भंगी हा शब्द उच्चारला नाही किंवा तो कोणाची अवहेलना करण्याच्या उद्देशाने वापरला नाही. हा शब्द भांग पुरविणाऱ्यांना उद्देशून वापरला असल्याचे स्पष्ट केले.

त्यावर याचिकाकर्त्यांनी असा प्रकारचा खुलासा युवराज सिंगकडून दाखल करण्यात आलेल्या उत्तरात देण्यात आले नसल्याचे स्पष्ट करत जरी युवराज सिंग यांने जरी तो शब्द एखाद्याला व्यक्तीला उद्देशून उच्चारला नसला तरी उत्तर भारतात दलित समुदायातील विशिष्ट जातींसाठी वापरला जातो. तसेच या जातीकडून स्वच्छतेचे काम केले जाते. त्यामुळे त्याने वापरलेल्या भंगी या शब्दामुळे एकप्रकारे त्या जातीतील व्यक्तींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच तो एखाद्याला खालच्या जातीतील किंवा वर्गातील असल्याचे दाखवून देण्यासाठी अर्थात व्यक्तीचा अवमान किंवा अपमान करण्याच्या उद्देशाने सदर शब्दाचा वापर सर्रास करण्यात येत असल्याचा युक्तीवाद करण्यात आला.

त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अमोल रतन सिंग म्हणाले की, एससी-एसटी कायद्यातील उद्दिष्ट आणि ध्येयाचा विचार केल्यास जरी माझ्या मतानुसार या शब्दाप्रयोगामुळे एससी-एसटी समुदातील एखाद्या व्यक्तीला भावनिकरित्या आणि अवमान करण्यासाठी त्या विशिष्ट जातीचा नामोल्लेख केला जातो. जरी त्याचा उद्देश एखाद्याच्या भावनांना ठेच लावण्याच्या उद्देशाने नसेल परंतु केवळ एवढ्या एका कारणामुळे त्याच्या विरोधात असलेली याचिका रद्द करता येत नाही.

यासंदर्भात जरी कदाचित तपास यंत्रणा वेगळ्या निष्कर्षावर येणार असतील तरीही युवराज सिंग याच्या विरोधात लावण्यात आलेली एससी-एसटी खाली नोंदविण्यात आलेले गुन्हे रद्दबातल करता येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

सदरचे गुन्हे दाखल झाल्यानंतर युवराज सिंग याने उच्च न्यायालयात धाव घेत पोलिस तपास थांबविण्याची विनंती न्यायालयाला केली होती. परंतु त्यावेळीही न्यायालयाने पोलिस तपास थांबविण्यास नकार दिला होता. तसेच युवनराज सिंग याने माफी मागितली तरी त्याच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द करता येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

त्यावेळी युवराज सिंग याने ज्या व्यक्तीसाठी भंगी हा शब्द वापरला तो त्या जातीत येत नसल्याचा युक्तीवाद केला होता. तसेच याचिकाकर्ता हा खंडणी वसूल करणारा आणि त्याला सतत अशा पध्दतीच्या याचिका दाखल करण्याची सवय असल्याचा मुद्दाही न्यायालयात युक्तीवाद करताना मांडला होता.

परंतु न्यायालयाने स्पष्ट केले की, याचिकाकर्ता हा त्या समाजातील असून तो त्या गोष्टीचा बळी ठरत असल्याचे एससी-एसटी कायद्याने स्पष्ट होत आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *