Breaking News

जिद्द, स्वाभिमानाच्या जोरावर महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या एका लोक कलावंतीनीचा प्रवास राष्ट्रपती पुरस्कारापासून कांताबाई अजूनही उपेक्षित

कुणी मार्गदर्शक नाही. नृत्यसाधनेतला गुरु नाही. एक लव्याप्रमाणे स्वत:च नृत्य शिकत त्यांनी तमाशा फड उभा करून तो लोकप्रियतेच्या  शिखरावर पोहचविला. महाराष्ट्राच्या तमाशावर प्रेम करणारे रसिक आज जिथे- जिथे आहेत,तिथे- तिथे   त्यांचे  नाव आदराने  घेतले  जाते.

वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षीच त्यांनी छोट्या मोठ्या कार्यक्रम आणि त्यानंतर तमाशात काम करायला सुरुवात केली. त्यावेळी फारसं उत्पन्न नसायचं. रात्री तमाशाचा खेळ झाला कि, दुसऱ्या दिवशी इतर गावाकडे जाताना, उपासमारीचा प्रश्न पडणारा तो काळ होता. तरी ही रात्री कंदिल – दिवा बत्तीच्या उजेडात रंगणाऱ्या खेळात त्यांनी रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. अशा या कै.तुकाराम तुकाराम खेडकर यांच्या पत्नी कर्मयोगिनी तमाशा साम्रज्ञी कांताबाई सातारकर ह्या उतराईकडे जात  असताना, आज कला रसिक भरभरून कौतुक करीत आहे. जनतेने त्यांना अक्षरश डोक्यावर घतले. पण  मायबाप सरकारने जर लवकरच त्यांचा राष्ट्रपती पुरस्काराने गौरव केला, तर हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान होईल.

गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगड खाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या कांताबाई यांना तमाशाचा तसा कोणताही वारसा नव्हता. पुढे त्यांचे आई-वडील सातारा या मूळगावी आले. इथे त्यांनी मित्र-मैत्रिणीसमोर नृत्य सादर करता करता नव झंकार या प्रसिध्द मेळाव्यात आपल्या नृत्याची झलक दाखवून दिली. अन त्यांचा कलाप्रवास सुरु झाला. छोट्या मोठ्या तमाशात काम करीत त्यांनी आयुष्याची मोठी स्वप्न बघितली.

रसिकांहो जो पर्यत तुमची साथ आहे, तो पर्यत आम्ही तुमच्या सेवेसाठी तयार आहोत. कारण आमच्या पायात घुंगराचा छनछनाट आणि तुमच्या टाळ्यांचा कडकडाट हीच आमची ऊर्जा आहे. असा कौतुकाचा नजराणा त्यांनी कला रसिकांवर उधळला. अन अख्खा महाराष्ट्र कांताबाईच्या प्रेमात पडला. रात्री टांगलेले कंदिल-गसबत्ती त्यांच्यासाठी चंद्र-तारे वाटायचे म्हणूनच या  उजेडात रंगणाऱ्या तमाशाच्या खेळात त्या रंग भरायच्या…आता कला हेच आपले जीवन, या ध्येयाने पेटलेल्या कांताबाई अत्यंत जिद्दी आणि कर्तृत्व सिध्द करणाऱ्या महिलांपैकी एक  होत्या. त्यामुळे खूप मोठी स्वप्न घेवून त्या मुंबईला पोहचल्या. अन लालबाग येथील हनुमान थिएटरच्या बोर्डावर त्या आपली कला सादर करू लागल्या.

तिथे त्यांनी काही दिवस वग सम्राट दादू इंदूरीकर यांच्या तमाशासह अनेक तमाशात काम केले. मात्र खऱ्या अर्थाने कांताबाई यांचा कला जीवनाचा प्रवास सुरू झाला तो तमाशा महर्षी तुकाराम खेडकर यांच्या तमाशातून. एक अस्सल कलाकार म्हणून या तमाशात त्या घडत गेल्या, तुकाराम खेडकर आणि कांताबाई या जोडीने नंतर साऱ्या महाराष्ट्राला हसायला लावलं, रडायला लावलं.. आणि आत्मचिंतनही करायला लावलं..ते विविध वगनाट्याच्या माध्यमातून असंख्य धार्मिक, पौराणिक, सामाजिक, आशय असलेल्या वगातून ही जोडी ग्रामीण भागात घराघरात पोहचली. अन शेवटी कांताबाईना तुकाराम खेडकर यांच्या सारखा कलेची जाण असणारा आयुष्याचा जोडीदारही मिळाला. म्हणता-म्हणता हा तमाशा प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचला होता. परंतु एक दिवस कांताबाईच्या आयुष्यात तुकाराम खेडकर यांच्या रूपाने असलेल्या उजेड नाहीसा अर्थात अचानक जग सोडून जाण्यानं झाला. सन १९६४ मध्ये खेडकरांचे निधन झाले आणि कांताबाईच्या जीवनात वनवास सुरू झाला. त्यानंतर जवळची माणसं त्यांच्या पासून दूर निघून गेली. इतके दिवस फडाची मालकी असणाऱ्या कांताबाई फडातून बाहेर पडल्या. पुढे त्यांच्या समोर आपल्या उपजीविकाचा मोठा प्रश्न उभा राहिला. परंतु त्या स्वाभिमानी-जिद्दी- धाडसी होत्या…हार हा शब्द त्यांच्या शब्दकोषात नव्हता. म्हणूनच आपल्या जिद्दीने पै-पै जमवून स्वत:चा तमाशा फड उभा केला. एका स्त्री जातीला आलेल्या दुखाची तमा न बाळगता त्या खऱ्याखुऱ्या भूमिकेत घुसल्या. उत्तम नायिका..उत्तम गायिका..उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका.. आणि फड व्यवस्थापक अशा विविध भूमिका त्यांनी लिलया पेलल्या.

‘डोम्याना‘ या कथेवर आधारित वगनाट्यातील कांताबाईची भूमिका अजरामर झाली. या वगनाट्यातील बायजा आक्काची भूमिका ही रसिकांना भूरळ पडून गेली. सुमारे ७० ते ८० च्या शतकात जवळपास तमाशाला बरे दिवस होते. अशा उमेदीच्या काळात कांताबाई यांचे वगनाट्य बघायला लोकं दहा बारा कोस दुरून यायचे. ज्यावेळी त्या रंगमंचावर आल्या की, आपल्या पहाडी आवाजात रसिकांना ‘रसिक मायबाप हो‘ अशी साद घालत. तेव्हा शांतता पसरायची. निसर्गाने पोट दिलं, नसतं तर ते भरण्यासाठी गावोगावी फिरण्याची वेळ आमच्यावर आली नसती. मात्र तुम्ही दिलेल्या बंधा रूपयाच्या बदल्यात कलेचे माप टाकणे आमचे कर्तव्य आहे, असे भावनिक आवाहन कला रसिकांच्या काळजाला भिडायचे.

कांताबाईनी आपल्या क्षेत्रात वेगळं स्थान मिळविले. आज त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघूवीर खेडकर यांनी आपल्या आई-वडीलांची परंपरा कायम ठेवून तमाशा क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला. कन्या अनिता, अलका, मंदाराणी, जावई आणि आपली नातवडं घेवून आजघडीला तमाशा मोठया दिमाखात सुरू ठेवलाय. संपूर्ण परिवारच या लोककलेच्या सेवेसाठी वाहून नेणारे खेडकर घराणं म्हणजे तमाशा क्षेत्रातील आदर्श कुटुंब म्हणावे लागेल. याचे सर्व श्रेय हे कर्मयोगिनी कांताबाई सातारकर यांना जातं. या थोर कलावंताला राष्ट्रपती पुरस्काराने गौरविले पाहिजे अशी भावना अनेक कलाप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लेखक-खंडूराज गायकवाड ([email protected])

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *