Breaking News

कान्सवारीवर वीणाचा ‘खरवस’ मराठी लघुपटही कान्सवारीला

मुंबई : प्रतिनिधी

‘वळू’, ‘गाभ्रीचा पाऊस’, ‘लालबाग परळ’, ‘जन्म’, ‘टपाल’, ‘बायोस्कोप’ यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणारी अभिनेत्री वीणा जामकर ‘लालबागची राणी’ या सिनेमानंतर सिनेसृष्टीतून जणू लुप्तच झाली. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लालबागची राणी’नंतर वीणा आणखी एखाद्या आव्हानात्मक भूमिकेत दिसेल अशी आशा होती, पण तसं काहीच झालं नाही. या दरम्यान ती एका वेगळ्या कामात व्यग्र होती. ती एका लघुपटात बिझी होती. वीणाची मुख्य भूमिका असलेला ‘खरवस’ हा लघुपट आता कान्सवारीवर निघाला आहे.

मागील काही दिवसांपासून जगभरातील सिनेप्रेमी आणि फिल्ममेकर्सना फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलचे वेध लागले आहेत. मानाच्या समजल्या या फेस्टिव्हलमध्ये वीणाची भूमिका असलेल्या ‘खरवस’ची वर्णी लागली आहे. कान्ससारख्या फेस्टिव्हलमध्ये आपला लघुपट दाखवला जाणार याचा वीणाला खूप आनंद झाला आहे. यासाठी वीणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘खरवस’च्या संपूर्ण टिमचे आभार मानले आहेत.

आदित्य जांभळे या तरुण दिग्दर्शकाने ‘खरवस’चं दिग्दर्शन केलं आहे. आदित्यच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘आबा ऐकताय ना’ या लघुपटाने यापूर्वी राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवल्याने ‘खरवस’कडूनही अपेक्षा वाढल्या आहेत. गोव्यामध्ये चित्रीत करण्यात आलेल्या या लघुपटात वीणासोबत स्वाती बोवलेकर, संदेश कुलकर्णी आणि वर्धन कामत व गौरी कामत हे गोव्यातील कलाकार आहेत. या लघुपटाची कथा आणि पटकथा आदित्यनेच लिहिली आहे. रवी रंजन यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून संकलन आदित्यने अमोघ बर्वेच्या साथीने केलं आहे. डॅा. स्मिता जांभळे यांनी या लघुपटाचं संवादलेखन केलं आहे. वीणा जामकरबाबत बोलायचं तर तिने कायमच आपल्या अभिनयाद्वारे सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. त्यामुळे कान्स दरबारी प्रदर्शित होणाऱ्या ‘खरवस’मध्येही तिचं कौतुकच होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *