Breaking News

चित्रपटाच्या नफ्यातून उभारणार दोन चॅरिटेबल हॉस्पिटल्स पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा निर्धार

मुंबई : संजय घावरे

नेत्र शल्यविशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे नाव आज केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर परदेशातही चांगलंच ज्ञात आहे. आजवर लाखों रुग्णांचे यशस्वी ऑपरेशन करून त्यांची नेत्रज्योत पुर्नप्रज्ज्वलीत करणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने यांचं जीवनचरित्र ‘डॉ. तात्याराव लहाने – अंगार… पॉवर इज विदीन’ या चित्रपटाद्वारे लवकरच येणार आहे. समाजसेवी वृत्तीने आजवर रुग्णांची सेवा करणारे डॉ. लहाने चरित्रपटाच्या विरोधात होते, पण दिग्दर्शक विराग मधुमालती वानखडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे त्यांचा नकार होकारात बदलला. येत्या शुक्रवारी म्हणजेच १२ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातील एक पैसाही डॉ. लहाने स्वत:साठी खर्च करणार नाही. जनतेकडून मिळणारा पैसा ते जनतेच्याच म्हणजे रुग्णांच्याच उपचारासाठी करणार आहेत. चित्रपटातून मिळणाऱ्या नफ्यातून आपण दोन चॅरिटेबल हॉस्पिटल्स उभारणार असल्याचं डॉ. लहाने यांनी ‘मराठी ई बातम्या’शी बोलताना सांगितलं.

डॉ. लहाने यांनी आजवर केलेला संघर्ष ‘डॉ. तात्याराव लहाने – अंगार… पॉवर इज विदीन’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रेस शोच्या निमित्ताने भेट झाली असता डॉ. लहाने यांनी आपले मनोगत व्यक्त केलं.

ते म्हणाले की, आपला चरित्रपट व्हावा असं मला कधीच वाटत नव्हतं. याच कारणामुळे मी स्वत:च्या चरित्रपटाच्या विरोधात होतो. विरागने खूपच हट्ट धरला. सतत पाठपुरावा करीत माझा सर्वांगीण अभ्यास केला. तरीही माझा विरोध होता, पण त्याने हार मानली नाही. निर्मितीसाठी पैसे नसल्याने त्याने घर विकलं आणि त्याचं धाडस पाहून मला हार पत्करावी लागली. त्याला होकार दिला आणि आज हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील प्रत्येक घटना सत्य आहे. कुठेही अतिरंजीतपणा नाही. या ही पेक्षा मी खूप सहन केलं आहे. त्यातील बराचसा भाग वगळण्यात आला आहे. सर्वच दाखवलं तर सिनेमागृहात अश्रूंच्या धारा वाहतील. या चित्रपटातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गोरगरीबांसाठी दोन चॅरिटेबल हॉस्पिटल्स सुरू करण्यात येतील. यापैकी एक हॉस्पिटल मुंबईत तर दुसरं औरंगाबादमध्ये उभारण्यात येणार आहे. या दोन्ही हॉस्पिटलमधून कोणताही रुग्ण पैशांअभावी उपचाराविना माघारी जाऊ नये अशी आमची योजना असेल. यातून अनेक विद्यार्थ्यांना मेडीकलचं प्रशिक्षण घेता येईल. अनेक डॉक्टर्स घडतील. रुग्णांच्या नातेवाईकांसाठीही काही व्यवस्था करण्याचा आमचा विचार आहे. उपचारासोबतच योग्य आहार देण्याकडे आमचा कल असेल. मी आजवर जसा संघर्ष केला तसा कोणाच्याही वाट्याला येऊ नये. आई-वडीलांची मनोभावे सेवा करा. गोरगरीबांना मदत करा. यातच खरा मानवता धर्म आहे असंही डॉ. लहाने म्हणाले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न

बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *