Breaking News

सव्वाशे कोटींच्या घरात ‘पद्मावत’ पहिल्या सहा दिवसातच शंभर कोटीचे उड्डाण

मुंबईः प्रतिनिधी

निर्मातादिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेला ‘पद्मावत’ प्रदर्शित होऊन पाच दिवस लोटले तरी या चित्रपटाच्या मागे लागलेला वाद काही थांबायला तयार नाही. विरोध, आरोपप्रत्यारोप आणि पाठिंब्याच्या या गदारोळात फार कमी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊनही ‘पद्मावत’ने सव्वाशे कोटींच्या घरात मजल मारली आहे.

पाच दिवसांमधील हा आकडा पाहता कोणत्याही प्रकारचा विरोध न होता जर हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असता तर कदाचित बॅाक्स ऑफिसवर एक नवा इतिहासही लिहिला गेला असता असं चित्रपट व्यवसायतज्ज्ञांचं म्हणणं आहे. कडेकोट बंदोबस्त आणि काहीशा भीतीच्या वातावरणात प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ने पहिल्या दिवशी म्हणजेच २५ जानेवारी, गुरुवारी १९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तत्पूर्वी पेड रिव्ह्यूच्या माध्यमातूनही या चित्रपटाच्या खात्यावर ५ कोटी रुपयांचा व्यवसाय जमा झाला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या चित्रपटाने मोठी झेप घेत बॅाक्स ऑफिसवर ३२ कोटी रुपये कमवले. शनिवारी या आकड्यात थोडीशी घसरण झाली, तरीही या दिवशीही ‘पद्मावत’ने २८ कोटींच्या घरात मजल मारली. रविवारी म्हणजे प्रदर्शित झाल्यानंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने ३० कोटींचा गल्ला जमवला. सोमवारीही या चित्रपटाने १४ कोटी रुपयांचा व्यवसाय करीत बाजी मारली. हे सर्व आकडे पाहता सोमवारपर्यंत या चित्रपटाच्या खात्यावर १२८ कोटी रुपये जमा झाले.

काही ठिकाणी चित्रपट प्रदर्शित न झाल्याने या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवरील विक्रम मोडीत काढले नसले तरी या चित्रपटातील प्रमुख कलाकारांच्या करियरमध्ये काही विक्रम नक्कीच केले आहेत. हा चित्रपट अलाउद्दीन खिलजीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रणवीर सिंहच्या करियरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. शाहिद कपूरच्या आजवरच्या करियरमधील १०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होणाराही हा पहिला चित्रपट आहे. १०० कोटींच्या क्लबच्या पंक्तीत विराजमान झालेला दिपीका पदुकोणचा हा सातवा, तर रणवीरचा तिसरा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी दिपीकाचे चेन्नई एक्स्प्रेस, हॅप्पी न्यू इयर, ये जवानी है दीवानी, बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला रामलीला आणि रेस २ या चित्रपटांनी १०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. रणवीरबाबत बोलायचं तर गोलियों की रासलीला रामलीला आणि बाजीराव मस्तानी या दोन चित्रपटांनंतर १०० कोटींच्या क्लबमध्ये जाणारा ‘पद्मावत’ हा रणवीरचा तिसरा चित्रपट आहे.‘पद्मावत’च्या आधीच्या आठवड्यात म्हणजेच १९ फेब्रुवारीला ११ चित्रपट प्रदर्शित झाले होते; परंतु सर्व चित्रपट फ्लॅाप ठरले. त्या पूर्वीच्या आठवड्यातील कालाकांडी .५० कोटी, मुक्काबाज .८३ कोटी, १९२१ १४.५० कोटीपर्यंत पोहोचू शकले. तर पाचव्या आठवड्यात पोहोचलेल्या सलमान खान, कतरीना कैफच्या ‘टायगर झिंदा है’ या चित्रपटाने ३३५.३३ कोटींचा आकडा गाठण्यात यश मिळवलं आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *