Breaking News

फडणवीसांचा पवारांवर पलटवार, “मावळमध्ये गोळीबाराचे आदेश राज्यकर्त्यांचेच” विरोधी पक्षनेतेपदावरही समाधानी असल्याने महाविकास आघाडी अस्वस्थ, ४० वर्षांनंतर पहिल्यांदा ५ वर्ष मुख्यमंत्री

पणजी: प्रतिनिधी

जालियनवाला बाग गोळीबार हा पोलिसांनी केला तरी त्यावेळी आदेश ब्रिटीशांच्या गव्हर्नर जनरल यांचे होते. अगदी तसेच मावळ गोळीबार हा पोलिसांनी केला तरी त्यांना आदेश राज्यकर्त्यांचे होते. त्यामुळे मावळ गोळीबार ही सुद्धा जालियनवाला बागसारखीच घटना आहे, असे प्रत्त्युत्तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिले.

गोवा दौर्‍यावर असताना माध्यमांनी काही विषयांवर त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते.

शरद पवार साहेबांची प्रेस कशासाठी होती, हेच लक्षात आले नाही. कारण ते अनेक विषयांवर बोलले. जालियानवाला बाग गोळीबारासाठी ब्रिटीश स्वत: गेले नव्हते, तर त्यांनी पोलिसांना गोळीबाराचा आदेश दिला. मावळमध्ये पोलिसांना गोळीबाराचे आदेशच होते. त्यामुळे मावळची घटना ही सुद्धा जालियनवाला बागसारखीच होती. कारण येथेही पोलिसांना आदेश देण्यात आले होते. प्रश्न असा आहे की, उत्तर प्रदेशच्या घटनेवर महाराष्ट्रात बंद केला जातो आणि तोही सर्व यंत्रणांचा वापर करीत, संपूर्ण दडपशाही करून. या बंद दरम्यान, पहिल्यांदा असे घडले की पोलिस संरक्षणात लोकांवर दबाव आणला गेला आणि त्यांना धमकावून बंद केला गेला. माध्यमांमध्ये जे व्हीडिओ येत आहेत, त्यातून हा बंद किती ‘शांतते’त झाला, हे लक्षात येते. राज्य पुरस्कृत भीती निर्माण करून केलेला बंद होता. शिवसेना बंदमध्ये सामिल झाली तर काय होते, हे स्वत: शरद पवार यांनीच सांगितले, ही तशी समाधानाची बाब आहे. पोलिस संरक्षणात मारहाण, धमक्या, दुकानांमधील माल लुटून नेणे चालू होते आणि पोलिस बघ्याची भूमिका घेत होते असा आरोप त्यांनी केला.

अनिल देशमुखांवरील कारवाई ही उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली. त्यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या सरकारने सीबीआयने चौकशीच करू नये, असे सांगितल्याने ज्यांनी देशाचे पैसे बुडविले, अशी बँक फसवणुकीची ८० प्रकरणे धुळखात पडून आहेत. आता उच्च न्यायालयावर सुद्धा यांचा विश्वास नाही काय? केंद्रीय संस्थांना महाराष्ट्रात ज्या पद्धतीने वागविणे सुरू आहे, तेही आक्षेपार्ह आहे, असेही ते म्हणाले.

राज्याच्या इतिहासात ४०वर्षांनंतर पहिल्यांदा सलग ५ वर्ष मला मुख्यमंत्री राहण्याचा मान मिळाला. मी विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा समाधानी असल्याने संपूर्ण महाविकास आघाडी अस्वस्थ आहे, हीच माझ्या कामाला पावती आहे. ज्या महाराष्ट्राचे आपण नेतृत्त्व केले, त्याच महाराष्ट्रात १००० कोटींची दलाली उघड होते, याची चिंता शरद पवार यांनी केली पाहिजे. खरे तर दलालांचे हे जाळे उद्धस्त करा, अशी मागणी त्यांनी केली पाहिजे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी पवारांना लगावला.

Check Also

अल्पसंख्याक विभागाकडून विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार-मंत्री नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *