Breaking News

“माझे आंगण, रणांगण” मतदारसंघ सोडून फडणवीस, प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे आंदोलन अडीच लाख कार्यकर्त्यांनी केले आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी
राज्य सरकारच्या निष्क्रीय काराभाराच्या विरोधात भाजपाने पुकारलेल्या माझे आंगण, रणांगण आंदोलनात भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आपला पुणे येथील मतदारसंघाऐवजी कोल्हापूरात फलक धरून आंदोलन केले. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला नागपूरचा मतदारसंघ सोडून मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
कोरोनाचे देशात सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू, आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडलेली आणि सामान्य माणूस हतबल. अशा स्थितीतही निष्क्रीय असलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या अडीच लाख कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राज्यभर ठिकठिकाणी ‘माझे अंगण, रणांगण’, अशी घोषणा देत ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात तर प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे हे अभिनव आंदोलन केले.
राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने धडाडीने पावले टाकून प्रभावी उपाययोजना करावी तसेच रोजंदारी कामगार, बारा बलुतेदार आणि शेतकरी यांच्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पन्नास हजार कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करावे या दोन प्रमुख मागण्या भाजपाच्या वतीने करण्यात आल्या. कोरोनाच्या संदर्भात सर्व नियमांचे पालन आणि कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांचा सहभाग हे आंदोलनाचे वैशिष्ट्य होते.
देवेंद्र फडणवीस मुंबई येथे म्हणाले की, राज्यात कोरोनाचे गंभीर संकट असताना राज्य सरकारची निष्क्रियता दिसत आहे. रुग्णांना उपचार मिळत नाहीत. रुग्णालये शोधत रस्त्यावर फिरावे लागत आहे. सरकारी रुग्णालयात जागा नाही आणि खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नाहीत. सर्व महानगरांमध्ये कोरोनाचा कहर आणि राज्य सरकारकडून पुरेशी तयारी नाही. मुंबईतील आव्हान पेलण्यासाठी ठोस पावले नाहीत. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांनी जनतेसाठी पॅकेज दिले पण राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्वतःहून जनतेला एक पैसा दिलेला नाही. शेतकरी, बारा बलुतेदार, असंघटित कामगार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक अशा सर्वांसाठी राज्य सरकारने पन्नास हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले पाहिजे.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, हे आंदोलन सरकार अस्थिर करण्यासाठी नाही. लोकांच्या वेदना मांडण्याला कोणी राजकारण म्हणत असले तरी आम्ही वेदना मांडणार. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन घराबाहेर पडले तर यंत्रणा हलेल आणि परिणामकारक काम होईल. कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण सापडला त्याला साठ दिवस झाले पण राज्यातील सरकार प्रभावी काम करत नाही. भाजपा सहकार्य करतानाच या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माजी मंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड, आ. राहुल नार्वेकर, माजी आ. राज पुरोहित मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालय येथील आंदोलनात सहभागी झाले होते. मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे कुटुंबियांसोबत आंदोलन केले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (दहिसर, मुंबई), माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व हंसराज अहीर (चंद्रपूर), एकनाथराव खडसे (मुक्ताईनगर, जळगाव ), पंकजाताई मुंडे (वरळी, मुंबई), गिरीश महाजन (जामनेर), राधाकृष्ण विखे पाटील (लोणी), विजया रहाटकर, हरिभाऊ बागडे व भागवत कराड (औरंगाबाद), रविंद्र चव्हाण (डोंबिवली ), आशिष शेलार (वांद्रे), गिरीश बापट (पुणे), सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख व जयसिद्धेश्वर स्वामी (सोलापूर), शिवेंद्रराजे भोसले (सातारा), राम शिंदे (चौंडी), जयकुमार रावल (धुळे), कपिल पाटील (भिवंडी), पूनम महाजन (विलेपार्ले), गोपाळ शेट्टी (बोरिवली) यांच्यासह भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, खासदार व आमदारांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. राज्यातील सर्व जिल्हे व तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांनी घरोघरी हे आंदोलन केले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *