Breaking News

कर्नाटक निवडणुकीचे निकाल जनतमताची दिशा स्पष्ट करणारे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे मत

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांची पार्श्वभूमी ही वेगळी असून जनता एकाच पद्धतीने विचार करत नाही हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा झाला असताना कर्नाटकमध्ये लोकसभेच्या २८ पैकी फक्त २ जागा विरोधी पक्षांनी जिंकल्या. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून भाजपचा दारूण पराभव झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण १२२१ जागांपैकी एकट्या काँग्रेस पक्षाने ५०९ जागा जिंकल्या असून काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने १७४ जागा जिंकल्या. काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ६८३ आहे तर दुसरीकडे जनतेने भाजपची केवळ ३६६ जागांवर बोळवण केली आहे. जनमत हे सातत्याने बदलत असल्याचे मत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केले. जनता प्रत्येक निवडणुकीला वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते हे या निकालांवरून स्पष्टपणे दिसून येते. कर्नाटकमध्ये दिसलेले हेच चित्र महाराष्ट्रातही दिसेल असा विश्वास व्यक्त करत कर्नाटक काँग्रेसचे त्यांनी अभिनंदन केले.
मागील पाच वर्षात फडणवीस सरकारने कोणतेही काम केलेले नसून निव्वळ घोषणाबाजीच केलेली आहे. विधानसभा निवडणुकीत फडणवीस सरकारची निष्क्रियता त्यांना घेऊन बुडणार असून आता या सरकारला वाचवायला कोणत्याही प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक देखील कामी येणार नाहीत. या सरकारचे सर्वच पातळीवरील अपयश पूर्णपणे माहिती असून जनता या सरकारला शिक्षा देण्यासाठी निवडणुकीची वाट पहात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून सरकारने हुरळून जाऊ नये असा इशारा देऊन काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेईल असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *