Breaking News

पवारांना पटोलेंचे प्रत्युत्तर, “राखायला दिलेल्यांनीच जमीन चोरली” शरद पवारांच्या टीकेनंतर काँग्रेसकडून उपरोधिक टोला

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात आज गणेश चतुर्थीचा दिवस असल्याने राजकिय क्षेत्रात सगळी शांतता असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसची अवस्था एखाद्या जमिनदाराच्या हवेली सारखी झाल्याची टीका करत खळबळ उडवून दिली. त्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यास प्रत्युत्तर देत जमीन राखायला दिलेल्यांनीच जमिनीची चोरी केल्याचा पलटवार करत पवारांवर शरसंधान साधायचा प्रयत्न केला.

एका खाजगी दूरचित्रवाणीवर शरद पवार यांची मुलाखत आज प्रसारीत झाली. त्यात पवारांनी काँग्रेसबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, काँग्रेसची अवस्था एखाद्या उत्तर प्रदेशमधील जमिनदारासारखी झाली आहे. देशात लँड सिलिंगचा कायदा आल्यानंतर त्यांची हजारो-शेकडो एकर जमिन गेली आणि ती १५-२० एकरवर आली. मात्र हवेल्या तशाच राहील्या. झोपेतून उठून जेव्हा जमिनदार घराबाहेर येतो, तेव्हा त्याला सगळं हिरवंगार दिसायला लागतं. त्याला बघुन तो म्हणत राहतो हे सगळं माझंच होतं आता नाही. तसं काँग्रेसचं झाल्याची टीका करत राहुल गांधींच्या नेतृत्वाबाबतही काँग्रेसवाले वेगळी भूमिका घेत नसल्याचेही ते म्हणाले.

पवारांच्या या वक्तव्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, त्यांनी काय बोलांव हा त्यांचा प्रश्न आहे. पण दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या नाही गेल्या पाहिजेत. असं मोठ्या व्यक्तिमत्वाला आम्ही लहान व्यक्ती सांगू शकतो असा उपरोधिक टोला लगावत काँग्रेसने कधीही जमीनदारी केलेली नाही. काँग्रेस हा काही जमीनदाराचा पक्ष नाही. ज्या लोकांना काँग्रेसने पॉवर दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला, हे सातत्याने देशभरातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे.

सामान्य जनता आजही काँग्रेस सोबत आहे. देशामध्ये भाजपाला एकच पर्याय तो म्हणजे काँग्रेसचा आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण या पद्धतीच्या प्रतिक्रिया देऊन काँग्रेस नेतृत्वाच्या खच्चीकरणाचा जो प्रयत्न केला जातो. हे आता कदापि कुणी मान्य करत नाही, काँग्रेस नेतृत्वचं २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होईल असे सांगत शरद पवार मोठे आहेत, त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाही असंच ठरलेलं आहे. परंतु, पक्षाबाबत त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे. खरंतर काँग्रेसने अनेक लोकांना जमीन राखायला दिलेली होती आणि जमीन राखणाऱ्या लोकांनीच जमीन चोरली, डाका मारल्याचा आरोप करत त्यामुळे ही परिस्थिती आज झालेली असेल, असं त्यांचं मत असेल असा उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, शरद पवार यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत असूनही काँग्रेस-राष्ट्रवादीत बेबनाव होवून त्याचा परिणाम सरकारवर होणार अशी अटकळ बांधली जात आहे.

Check Also

…ओबीसी व खुल्या वर्गावरचा अन्याय दुसरीकडे भरून काढणार राज्य सरकारचा निर्णय घेतल्याची अजित पवारांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या आदिवासीबहुल जिल्हयात ओबीसी जागांवर परिणाम होतोच आहे. शिवाय इतर खुल्या वर्गावरदेखील अन्याय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *