Breaking News

पारदर्शक मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांना लागली गोडी भूखंडाच्या श्रीखंडाची प.दिनदयाल सेवाभावी संस्थेला मुंबईतील १२०० चौ.मीटरची जागा

मुंबईः खास प्रतिनिधी
राज्यातील जनतेच्या अर्थात राज्य सरकारच्या मालकीचा भूखंड पत्नीसाठी तिरूपती देवस्थानला देण्याचा प्रताप नुकताच उघडकीस आला. आता त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थापन केलेल्या पंडीत दिनदयाल उपाध्याय सेवाभावी संस्थेस भूखंडाचे श्रीखंड देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी महसूल आणि शिक्षण विभागाने फारच सोपस्कार पार पाडल्याची माहिती मराठी ई-बातम्या या संकेतस्थळाच्या हाती आली आहे. त्यामुळे पारदर्शक मुख्यमंत्री फडणवीसांनाही भूखंडाच्या श्रीखंडाची गोडी लागल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई शहरातील ऐन चर्नी रोड स्टेशन लगत आणि गिरगांव चौपटीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जवाहर बालभवन इमारतीच्या पुढील आणि मागील बाजूस दोन भूखंड आहेत. यापैकी इमारतीच्या पुढे पार्कींगसाठी वापरण्यात येत असलेला १२०० चौरस मीटरचा भूखंड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील असलेल्या पंडीत दिनदयाल सेवाभावी संस्थेला देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या नव्या धोरणानुसार २५ जुलै २०१९ च्या शासन निर्णयानुसार यासाठी कोणतीही जाहीरात प्रसिध्द करण्यात आली नसल्याची माहिती महसूल विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
हा भूखंड कोणत्याही सोपस्काराशिवाय मिळावा यासाठी एक खोटी सुणावनीही घेण्यात आली. त्यामध्ये सदरच्या भूखंडाचा वापर शिक्षण विभागाने जवाहर बालभवनकडून अद्याप पर्यंत करण्यात आलेला नाही. त्यामुळे या भूखंडाची आवश्यकता भवन प्रशासनास नसल्याचे लेखी निवेदन घेण्यात आले. त्याचबरोबर ऐरवी एखाद्या संस्थेला दिलेल्या भाडेपट्ट्याची मुदत संपत आली असताना ती वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून स्वतःहून पुढाकार घेतला जातो. मात्र राज्य सरकारच्याच अखत्यारीत असलेल्या जवाहर भवनाला दिलेल्या भाडेपट्ट्याची मुदत नेमकी संपत आल्याचे कारण पुढे करत सदरचा १२०० चौरस मीटरचा भूखंड ऑगस्ट महिन्यात महसूल विभागाने काढून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
यासाठी महसूल विभागानेही हा भूखंड मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील संस्थेला द्यायचा असल्याने तो लगबगीने काढून घेतला. मात्र ऐन निवडणूकीत याचा बाऊ होवू नये यासाठी सदर संस्थेकडून जमिन मागणारे पत्र मुंबई जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाला मागील तारखेनुसार देण्यात आले. त्यामुळे सदरची जमिन ही विनासायस या संस्थेला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबतचा निर्णय लवकरच होणार असून पुढील दोन दिवसात जर आचारसंहिता लागू झाली नाही तर राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने सदरची जमिन मुख्यमंत्र्यांच्या संस्थेला देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याबाबत पंडीत दिनदयाल सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीत असल्याने त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

पंडित दिनदयाल उपाध्याय सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी
अध्यक्ष-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सेक्रेटरी-अनिल साखरे
खजिनदार-आशिष शेलार
ट्रस्टी- चंद्रकांत पाटील, विनित जैन, जगदीश पाटील आणि अन्य एक सदस्य

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *