Breaking News

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलाच्या निवडीवरून भाजपात धुसफुस पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेला फाटा दिल्याची कार्यकर्त्यांची भावना

कोल्हापूर-मुंबईः विशेष प्रतिनिधी
भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी राज्यातील नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर दिल्ली दरबारी मोर्चेबांधणी सुरु असतानाच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी या पदाची माळ चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात टाकली. मात्र ही माळ टाकताना पक्षाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेलाच बाजूला सारल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असून त्याचा स्फोट आगामी अधिवेशनात होण्याची शक्यता भाजपाच्या जून्या जाणत्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड ही राज्यातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीसांच्या उपस्थितीत करण्यात येते. तसेच त्यासाठी कोणत्याही एका जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षाकडून प्रदेशाध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडला जातो. त्यास किमान पाच जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांकडून अनुमोदन दिल्यानंतर प्रदेशाध्यक्षाची निवड केली जाते. मात्र चंद्रकांत पाटील यांची निवड करताना यासर्वच गोष्टींना फाटा दिल्याचे भाजपाच्या एका वरिष्ठ निष्ठावंताने सांगितले.
विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर भाजपाचे अनेक कार्यकर्त्ये नाराज आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष पदावर पुन्हा पाटील यांची नियुक्ती होवू नये अशी मागणी अनेक नेते-कार्यकर्त्यांनी दिल्लीत जावून गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली होती. मात्र भाजपाच्या १६ फेब्रुवारी २०२० रोजी होणाऱ्या अधिवेशनात याविषयीचा प्रस्ताव मांडून पाटील यांची निवड करण्याची धोरण होते. परंतु या नाराजीचा उद्रेक अधिवेशनात उमटू नये यासाठी चंद्रकांत पाटील यांची निवड जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष पदाकरीता राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे हे ही रिंगणात होते. तसेच त्यादृष्टीने त्यांनी बांधणीही सुरु केली होती. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांच्या पारड्यात वजन टाकत प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लावण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
तरीही नेरूळ येथे होणाऱ्या भाजपाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात याबाबत आवाज उठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

सा.बां.विभागाच्या रस्त्यांवर चालणाऱ्या या वाहनांच्या टोलमध्ये वाढ हलक्या वाहनांवरील सूट कायमच-मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *