Breaking News

आम्ही राज्यपालांना भेटणार मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीतील नेते भेटणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने विरोधकांकडून आरोप करण्यात येत असून महाराष्ट्राची बदनामी करून गोंधळाचे वातावरण निर्माण केले जात आहे. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वेळ देण्याबाबतची विचारणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. मात्र आज राज्यपाल मुंबईबाहेर आहेत. मात्र ते जर संध्याकाळी परत आले तर त्यांची आज संध्याकाळी भेट घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात मालेगांवचे माजी आमदार आसिफ शेख यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ते बोलत होते.
अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात आल्याप्रकरणाची चौकशी सध्या एनआयए आणि एटीएसकडून तपास सुरु आहे. याशिवाय हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसने जवळपास पूर्ण केलेला आहे. परंतु आजच ठाणे न्यायालयाने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरीत करावा असे आदेश दिल्याचे सांगत याप्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल असे सांगत महाविकास आघाडीचे सरकार कोणालाही पाठिशी घालणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी असल्याची अफवा काही जणांकडून जाणीवपूर्वक पसरविण्यात येत आहे. मात्र आघाडीतील घटक पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा बेबनाव नसल्याचे सांगत सर्व पक्ष एकत्रित असून सरकारमध्ये कोणताही बेबनाव नसल्याचे त्यांनी सांगितले.
आज मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला.
कोरोनाची महामारी आल्यानंतर महामारीत काळजी घ्या असे आवाहन केले होते आणि मालेगावच्या लोकांना कोरोनातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले.
आसिफ शेख यांच्या काही अडचणी होत्या. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या लोकांची राष्ट्रवादीशी नाळ जोडलेली आहे. आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला आहे तो चांगला आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष पॅकेज देण्यात आले तसा असंघटित कामगारांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान डीपीडीसीमध्ये जास्तीचा निधी नाशिकला दिला जाईल असे आश्वासनही देत राष्ट्रवादी आजपासून तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.
संकटात आम्ही मजबुतीने एकत्र उभे राहिलो – जयंत पाटील
२१ वर्षात राष्ट्रवादी पार्टीवर अनेक संकटे आलेली पाहिली आहेत. मात्र मजबुतीने आम्ही एकत्र राहिलो आहोत. मागील पाच वर्षात आम्ही आमच्या अडचणीमुळे सत्तेत जात असल्याचे काही लोक सांगून पक्ष सोडून गेले मात्र पक्ष आज सत्तेत आला आहे याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करुन दिली.
मालेगावमधील लोकांना पवारसाहेबांच्या कामावर विश्वास आहे. मालेगाव नगरपालिकेत ज्या समस्या आहेत त्याची कल्पना आम्हाला दिली आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
सत्तेत येण्यासाठी माशासारखे तडफडत आहेत-छगन भुजबळ
ज्या पध्दतीने सरकार पाडण्यासाठी भाजप वेळ खर्च करत आहेत. सत्तेत येण्यासाठी माशासारखे तडफडत आहेत असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावतानाच त्यांना का घाबरायचं असा सवाल केला.
आता आम्ही लढणार. जो घाबरला तो संपला असा इशाराही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिला.
तुम्ही राष्ट्रवादीत आला त्याचं दु:ख बाळगू नका. तुम्हाला ताकद पक्ष देणार आहे. ताकद वाढवून तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन छगन भुजबळ यांनी दिले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *