दत्तात्रय भरणे यांची माहिती, बहुप्रतिक्षेत असलेली कृषी समृद्धी योजना राबवण्यास मान्यता बळीराजाच्या उन्नतीसाठी कृषीमंत्र्यांचे आश्वासक पाऊल, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र आणि ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा (बीबीएफ) यंत्रांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने पुढील तीन वर्षासाठी ५ हजार ६६८ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या अनुषंगाने आणि बदलत्या हवामानामुळे अतिवृष्टीसारख्या निर्माण होणाऱ्या संकटास सामोरे जाण्यासाठी कृषी विभागाने राबविलेली कृषी समृद्ध योजना शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल असे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या प्रचलित योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या ट्रॅक्टरचलित रुंद सरी वरंबा (बीबीएफ) यंत्र, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र उभारणी आणि मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन हे घटक अधिक विस्तृत स्वरुपात राबवून राज्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने शासन निर्णयान्वये उक्त घटकांची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे. जास्तीत जास्त शेतक-यांना फायदा मिळण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संकल्पनेतून या योजनेला विस्तृत स्वरुप मिळाले आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी समृद्धी योजनेतून ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा यंत्र, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र उभारणी, मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या चार घटकांचा समावेश आहे. यामध्ये २५ हजार रुंद सरी वरंबा यंत्रासाठी १७५ कोटी, १४ हजार वैयक्तिक शेततळ्यासाठी ९३ कोटी, शेतकरी सुविधा केंद्र उभारणीसाठी ५ हजार कोटी आणि ५ हजार ड्रोनसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत विविध शेती उपयोगी यंत्र पुरवणे, जैविक निविष्ठ निर्मिती केंद्र उभारणे, प्लास्टिक अस्तरीकरण, शेततळे, एकात्मिक कीड नियंत्रण, अन्नद्रव्य घटक व्यवस्थापन, मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारणी, शेतीसाठी ड्रोन या आदी बाबींचा समावेश आहे.”

ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा (बीबीएफ) आणि शेततळ्यांसंदर्भात बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यभरात २५,००० बीबीएफ यंत्रांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, त्यासाठी एक यंत्र दर हंगामात सुमारे १०० हेक्टर क्षेत्रावर काम करू शकते. परिणामी २५ लाख हेक्टर क्षेत्रावर ही पद्धत लागू करता येईल. तसेच बियाण्याचा वापर ३०-४० टक्के कमी आणि उत्पादनात १५-२० टक्के वाढ अपेक्षित असून यंत्राच्या किमतीच्या ५० टक्के किंवा कमाल ७० हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच, राज्यात १४,००० शेततळ्यांच्या बांधकामासाठी मान्यता दिली गेली आहे. त्याचसोबत, काळी चिकणमाती असलेली जमीन प्राधान्याने निवडली जाईल. वाहत्या पाण्यात किंवा दलदलीच्या भागात कुंड्या घेता येणार नाहीत. यामध्ये शेडच्या आकारानुसार १६ हजार ८६९ ते १ लाख ६७ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार असल्याचेही यावेळी सांगितले.

मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शासनाने २ हजार ७७८ शेतकरी सुविधा केंद्रे उभारण्यास मान्यता दिली आहे. प्रत्येक केंद्रासाठी सरासरी प्रकल्प खर्च ३ कोटी रुपये असून कमाल अनुदान मर्यादा १ कोटी ८० लाख रुपये ठेवण्यात आली असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, यामध्ये मृद परीक्षण प्रयोगशाळा, जैविक खत उत्पादन केंद्र, भाडे तत्त्वावर अवजारे व ड्रोन उपलब्धता केंद्र, गोडाऊन व शीतसाखळी सुविधा, कीडनियंत्रण सामग्री व अन्नद्रव्य घटक याचा समावेश आहे. या नव्याने उभारण्यात येत असलेल्या शेतकरी सुविधा केंद्रांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तसेच, केंद्र शासनाच्या नमो ड्रोन दिदी योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन याअंतर्गत राज्यात ५ हजार कृषी ड्रोन अनुदानावर दिले जातील. यामध्ये, ड्रोन किमतीच्या ५० टक्के किंवा ८ लाख रुपये अनुदान कृषी पदवीधरांना दिले जाईल. इतर लाभार्थ्यांना ४० टक्के किंवा ४ लाख रुपये अनुदान दिले जाईल. ड्रोन खरेदीसाठी, महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

योजनेसाठी कोण पात्र?

शेवटी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, २०२५-२६ ते २०२७-२८ या तीन वर्षासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून अर्जदार राज्यातील सातबारा धारक असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्याकडे अॅग्रीस्टॅक फार्मर नोंदणी क्रमांक आवश्यक आहे. लाभार्थी शेतकऱ्याने कृषी विभागाच्या महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज केल्यावर प्रथम येणाऱ्यास प्रथम लाभ या तत्वावर लाभार्थी निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना डीबीटीतून थेट बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या महाडीबीटीवर अर्ज करून लाभ घेऊ शकतात.

About Editor

Check Also

किमान आधारभूत किमतीने सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू ऑनलाइन ॲपद्वारे व खरेदी केंद्रावर नोंदणी राज्यस्तरीय तीन नोडल संस्थांची नियुक्ती

सोयाबीन, मूग आणि उडीद या शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. या खरेदीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *