Breaking News

निमित्त दही हंडीचे, शिंदे गट- भाजपाकडून समिकरण मात्र महापालिका निवडणूकीचे गोविंदा पथकांना आकृष्ट करण्याकडे कल

राज्याच्या राजकारणात विशेषत: २०१४ साली सत्तेत आल्यापासून आणि विरोधात बसून पुन्हा सत्तेत विराजमान झालेल्या भाजपाकडून प्रत्येक गोष्ट ही निवडणूक प्रचार आणि मतदार वाढविण्यासाठी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे प्रत्येक सण आणि प्रत्येक गोष्ट ही इव्हेंट पध्दतीने करायची असा खाक्याच जणू भाजपाने स्विकारल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर आता शिवसेनेतून बाहेर फुटून वेगळी चूल मांडलेल्या एकनाथ शिंदे गटालाही याच रस्त्याने नेण्याचे काम भाजपाकडून सुरु झाल्याचे दिसत आहे.

मुंबईतला दही हंड़ीचा उत्सव हा काही नवा नाही. मात्र मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे हा उत्सवच साजरा करता आला नाही. त्यातच आता शिवसेनेतून फुटून वेगळे झालेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे ५० आमदार यांच्यासोबत शिवसेनेच्या १२ खासदारांनीही शिंदे गटात आश्रय घेतला. याशिवाय मुंबई ठाणे आणि बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तसेच ठाणे जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के माजी नगरसेवकांनीही शिंदे गटाची वाट धरली. परंतु, मुंबईतील अपवाद वगळता फारसं कोणी शिंदे यांच्यासोबत गेले नाही. आणि तसे आता कोणी जाईल याची शक्यताही सध्या तरी धुसर असल्याचे दिसून येत आहे.

यापार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणूकांचे बिगुल कधीही वाजू शकते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या बंडखोरीनंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांना नव्या मतदारांची गरज वाटत आहे. जर ही शिवसेनेची मुळ मते जरी शिंदे-भाजपाकडे वळविण्यात यश आले नाही तर किमान दही हंडीच्या निमित्ताने तरूण वर्ग या दोघांकडे वळाल्यास ते हवेच आहे. त्यामुळे पहिल्यांदाच दही हंडीला साहसी खेळाचा दर्जा देत दही हंडीच्या खेळात सहभागी होणाऱ्या गोविंदाचा मृत्यू झाल्यास १० लाखाची नुकसान भरपाई, शाररीक अवयव निकामी झाल्यास ५ लाख आणि सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण आदी घोषणा दही हंडीच्या एक दिवस आधी करून ही तरूणाई आपल्याकडे मतदार म्हणून खेचली जाईल यादृष्टीने चोख बंदोबस्त केल्याचे दिसून येत आहे.

त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे यंदाही दही हंडी आयोजित करणाऱ्या आमदारांबरोबरच शिंदे गटातील काही समर्थक आणि भाजपाकडून नव्याने ३७० ठिकाणी दही हंडीचा उत्सव आयोजित करण्यात आला. या सर्व ठिकाणच्या आमदार आणि कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी राज्याच्या राजकिय इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळपासून फिरत असल्याचे दिसून आले. मुंबई आणि ठाण्यातील मिळून जवळपास २० ते २५ ठिकाणी या दोघांनी जावून आपण या दही हंडीसोबत असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

त्यातच या दोघांकडून हिंदूत्वाचा नारा देत दही हंडी हा हिंदूचा सण असल्याने आम्ही हा सण उत्साहात साजरा करण्याचे जाहीर आवाहनही करण्यात येत आहे. त्यामुळे आता विधानसभा, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूकांसाठी आता हिंदूत्वाचा अजेंडा भाजपा आणि शिंदे गटाकडून फिक्स करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

तर दुसऱ्याबाजूला उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून कोणताही आमदार दही हंडी उत्सव साजरा करताना किंवा त्यांच्या समर्थकांकडून या उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे दिसून आले नाही. राष्ट्रवादीचे मुंब्रा-कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड हे दरवर्षी दही हंडीचे आयोजन करतात. मात्र यावेळी त्यांची दही हंडी दुर्लक्षित राहिली आहे.

मात्र भाजपा आणि शिंदे गटाकडून निश्चित करण्यात येत असलेल्या हिदूत्वाच्या अतिरेकाचा परिणाम दही हंडीतील तरूणाईवर किती होणार हे महापालिका निवडणूकीच्या वेळी दिसून येईलच. पण तोपर्यत तरूणाई ते वृध्दांपर्यत हिंदूत्वाच्या निमित्ताने एका माळेत ओवण्याचा प्रयत्न भाजपा आणि शिंदे गटाकडून जोरदारपणे करण्यात येत आहे.

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *