Breaking News

रूग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान, दम असेल तर… पूर्ण ताकदीने प्रचारात सहभागी होणार

हनुमान चालिसा प्रकरणावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला आव्हान देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रूग्णालयात पाठीच्या दुखण्याच्या कारणाखाली वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठी दाखल झाल्या. त्यानंतर तीन ते चार दिवस रूग्णालयात राह्यल्यानंतर आज त्या अखेर बाहेर आल्या. बाहेर आल्या आल्या त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला आव्हान देत म्हणाल्या की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दम असेल तर लोकांमध्ये यावं, कोणत्याही ठिकाणाहून निवडणूक लढवून दाखवावी मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकून दाखवेन असे आव्हान दिले.

त्याचबरोबर दोन पिढ्यांपासून मुंबई महानगरपालिका यांच्याकडे आहे. मात्र, येणाऱ्या काळात मुंबईची जनता आणि रामभक्त त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. मी पूर्ण ताकदीने मुंबई पालिका निवडणुकीत उतरेल. शिवसेनेने मुंबई पालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची लंका तयार केलीय. ती लंका आम्ही नष्ट करू. पालिकेतील शिवसेनेची भ्रष्टाचाराची लंका नष्ट करू असा इशाराही त्यांनी दिला.

आज रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयातून सर्व वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आज बाहेर पडल्या. त्यानंतर त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. या तीन चार दिवसात लीलावती रूग्णालयात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या, महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ, आमदार आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांनी नवनीत राणा यांची भेट घेतली.

मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईला न्याय देण्यासाठी, चांगला विकास व्हावा यासाठी आणि भ्रष्टाचाराची लंका संपवण्यासाठी मी पालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदीने प्रचाराला उतरेल. जे रामभक्त आहेत त्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांना पाठिंबा देईन असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष शिवसेनेला आव्हान दिले.

मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावं आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवा. त्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील मतदारसंघ निवडावा, मी त्यांच्याविरोधात उभी राहील आणि निवडून येऊन दाखवू. तेव्हा त्यांना जनतेची ताकद काय असते हे कळेल असे आव्हानही त्यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले.

माझा ठाकरे सरकारला सवाल आहे की मी अशी काय चूक केली की त्याची मला शिक्षा देण्यात आली. जर हनुमान चालिसाचं पठण करणं आणि भगवान श्रीराम यांचं नाव घेणं गुन्हा असेल आणि त्यासाठी मला १३-१४ दिवसांची शिक्षा ठाकरे सरकारने दिली असेल तर मी १४ दिवस नाही, तर १४ वर्षे तुरुंगात राहण्यास तयार असल्याचेही त्या म्हणाल्या.

तुरुंगात टाकून ते एका महिलेचा आवाज दाबू शकतील असं त्यांना वाटत असेल, तर १४ दिवसात ही महिला दबली जाणार नाही. आमची लढाई देवाच्या नावाची आहे. मी ही लढाई पुढेही लढत राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

क्रुरपणे एका महिलेवर जी कारवाई झाली ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. डॉक्टरांनी माझी तातडीने तपासणी होऊन उपचार होणं गरजेचं असल्याचं लिहून दिलं तरी उपचार देण्यात आले नाहीत. तुरुंगात माझं मानसिक शोषण झाले. आज मी डॉक्टरांना विनंती करून डिस्चार्ज घेतला आहे. अजूनही माझ्या बऱ्याच तपासण्या बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *