Breaking News

किशोरी पेडणेकरांचे नवनीत राणाला प्रत्युत्तर, मागे अॅम्पलिफायर लावल्याने ती खाज वाढतेय शिवसैनिक अक्कल ठिकाणावर आणतील

१४ दिवसांच्या तुरुंगवासानंतर लीलावती रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल झालेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या आज बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खुले आव्हान देत दम असेल तर लोकांमध्ये या आणि कोणत्याही ठिकाणाहून निवडणूक लढवा मी तुमच्या विरोधात लढवून दाखवेन असा थेट इशारा देत पालिकेतील शिवसेनेची लंका नष्ट करू असे आव्हानही दिले.

त्यानंतर मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणा यांनी दिलेल्या आव्हानाला खोचक पध्दतीने प्रत्युत्तर देत म्हणाल्या की, नवनीत राणा जे बोलल्यात ते हल्लाबोल नसून त्यांची खाज आहे.

नवनीत राणा जाणूनबुजून महाराष्ट्र आणि मुंबई अस्थिर करण्यासाठी, दंगल घडवण्यासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. त्या बोलल्या ते हल्लाबोल नसून त्यांच्यातली खाज आहे. त्यांच्या वक्तव्याला हल्लाबोल म्हणणं म्हणजे त्या शब्दाचा अपमान आहे. आपले मुख्यमंत्री हल्लाबोल करण्यासारखे नाहीत. उद्धव ठाकरे हे त्यांच्या चांगल्या कामामुळे केवळ राज्यातच नाही तर देशातही अव्वल आले, ती खरी दोघांचीही पोटदुखी आहे, एकाचा “भोंगा” आहे तर दुसऱ्याचा “सोंगा” आहे आणि “अॅम्प्लिफायर” तर वेगळाच असल्याची खरपूस टीकाही त्यांनी केली.

उद्धव ठाकरेंनी जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवावं, असे राणांनी दिलेल्या आव्हानाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, तुझी लायकी तरी आहे का? लोकशाहीने अधिकार दिला म्हणून काहीही बोलायचं. खासदार आहात ना, मग त्याप्रमाणे तुमचं वर्तन असूदेत ना. नंतरचे जे फोटो आलेत त्यातली नासमज अजूनही आहे, असं वाटतंय. आम्हाला वाटलं होतं, बबली मोठी झाली, पण नाही बबली मोठी नाही झाली. बबली नासमझ है, मागचा अॅम्प्लिफायर लावला जातोय आणि ती खाज वाढतेय, पण त्या खाजेवर आमच्याकडे औषध असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या ठाकरे घराण्यातील लोकांबद्दल आणि शरद पवार यांच्याबद्दल बोलल्याशिवाय या लोकांना प्रसिद्धी मिळत नाही. हे सगळं प्रसिद्धीसाठी आहे. आपण पाहिलं की गेल्या दोन दिवसांत नवनीत राणांना कोण जाऊन भेटलं ते सगळे अॅम्प्लिफायर (किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार) आहेत आणि ही तिकडची ऊर्जा आहे. पण आम्हाला आम्हाला फरक पडत नाही, अशा आव्हानांमुळे शिवसेना अजून उजळून निघेल असेही त्या म्हणाल्या.

असे भोंगे आणि असे सोंगे लागणारच हे त्यांना कळून चुकलंय. म्हणून अॅम्प्लिफायर गरजेचा आहे. शिवसेनेनं मुंबई आणि महाराष्ट्रासाठी कायमच संघर्ष केलाय. संघर्ष आम्हाला नवा नाही. गाय वा म्हैस पळवायची असेल तर विरुद्ध दिशेला घंटा वाजवला जातो, त्याप्रमाणेच भाजपाकडून विरुद्ध दिशेला हा भोंगा आणि सोंगा वाजवला जातोय. महागाई वाढलीये, त्यावर बोलायचं नाही, १५ लाखांवर बोलायचं नाही, अच्छे दिन कधी येणार यावर बोलायचं नाही. तसेच यावर दुसऱ्यांनी बोलू नये म्हणून म्हैस पळवली जाते, घंटा आणि भोंगा-सोंगा वाजवला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

बबलीची अक्कल ठिकाणावर आली नसेल शिवसैनिक ठिकाणावर आणतील. नाटकं करणं सोप्प असतं, तुरुंगात १४ वर्ष काढायची तयारी होती, तर मग हे दुखतंय, ते दुखतंय, असं करत रुग्णालयात का पोहोचल्या? असा सवाल करत आम्ही संविधान आणि कायद्यात राहून तुम्हाला उत्तर देऊ. तसेच बंटी आणि बबली तुम्ही कोर्टाने घालून दिलेले नियम लक्षात घ्या, अॅम्प्लिफायरचं जास्त ऐकू नका असा खोचक सल्लाही त्यांनी नवनीत राणा यांना दिला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *