Breaking News

शिवसेनेमुळे राज ठाकरे यांनी स्विकारली “ती” भूमिका? महाविकास आघाडीत दाखल झाल्याने मनसे भाजपाच्या जवळ

काही वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे हयातीत असतानाच शिवसेनेचा उत्तराधिकारी कोण? या प्रमुख मुद्यावरून राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी शिवसेनेतील राज समर्थक जे नेते होते ते ही बाहेर पडले. त्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करत महाराष्ट्राची ब्ल्यु प्रिंट तयार करून ती महाराष्ट्रासमोर सादर केली.या ब्ल्यु प्रिंटचे सादरीकरण आणि त्यावेळी पक्षाचा जाहीर केलेला त्यावेळचा झेंडा हे दोन्ही पाहता राज ठाकरे हे राजकारणातील लंबी रेसचे घोडे असल्याचा एक दृष्टीकोन राज्यातील अनेकांमध्ये तयार झाला. त्या बळावर पहिल्याच निवडणूकीत मनसेला विधानसभेच्या १३ जागी विजय मिळत राज्याच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली.

मात्र त्यानंतरच खऱ्या अर्थाने राज ठाकरे यांच्या मनसेच्या राजकिय गोंधळाला सुरुवात झाली. सुरुवातीला कधी राष्ट्रवादीच्या तर कधी काँग्रेसच्या बाजूने अप्रत्यक्ष भूमिका घेण्यास सुरुवात केली. पक्षाच्या कार्यकर्त्यांना सातत्याने कोणताही कार्यक्रम न देण्याच्या पध्दतीमुळे मनसैनिकही काही काळ गोंधळाच्या परिस्थितीत राहीले. दरम्यानच्या काळात नाशिक महापालिकेची सत्ता पहिल्यांदाच मनसेच्या हाती आल्यानंतर तेथील विकास कामे तर झाली. पण त्यानंतर त्यानंतर तेथील नागरीकांना पक्षाशी बांधून ठेवण्यास मनसेला अपयश आले. त्यानंतर नाशिक महापालिकेच्या निवडणूकीत अपयशही आले. तत्पूर्वी विधानसभा निवडणूका जसजशा जवळ येवू लागल्या तसे मनसेचे आमदार असलेले राम कदम, प्रविण दरेकर यासह अनेक आमदारांनी यातील काही जणांनी भाजपाची वाट धरली तर काही जण शिवसेनेत गेले.

त्यानंतर राज ठाकरे यांनीही पक्षाला सक्रिय ठेवण्यासाठी कोणताही कार्यक्रम हाती घेतल्याचे राज्यातील जनतेच्या निदर्शनास आले नाही. मात्र मनसे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष होते. परंतु २०१४ च्या सार्वत्रिक निवडणूका जसजशा जवळ येवू लागल्या तसे भाजपा-शिवसेनेच्या युतीत अप्रत्यक्ष घुसखोरी करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला. त्यादृष्टीने देशात सर्वप्रथम राज ठाकरे यांनीच गुजरातच्या विकासाचे कौतुक करत त्यावेळचे भाजपा नेते गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांची एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेट घेतल्याचे वृत्त बाहेर आले आणि तेथेच मनसेची पहिली फसगत झाली. त्यावेळी मनसेने जे काही उमेदवार उभे केले ते काँग्रेस राष्ट्रवादी उमेदवारांच्या विरोधात उभे न करता त्यांनी शिवसेनेच्या विजयी झालेल्या उमेदवारांच्या विरोधातच ठराविक ठिकाणी उमेदवार उभे केले.  त्यामुळे लोकांमध्ये एक संदेश गेला की, मनसे फक्त शिवसेनेच्या विरोधात उमेदवार देते आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात फक्त भाजपाला जागा देत आहे. विशेषत: त्यावेळी भाजपाबरोबरच मनसेनेही मोदींच्या नावावरच मते मागितली. त्यामुळे राज ठाकरे पर्यायाने मनसेचे खाते शून्यच राहीले.

यानंतर २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक जसजशी निवडणूक जवळ येवू लागली तसे राज ठाकरे यांच्या भूमिकेत १८० अंश कोनाचा बदल झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात थेट भूमिका घेत जनतेत गेले. परंतु दरम्यानच्या काळात राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडिओ या जाहीर सभेतील क्लृप्ती भलतीच लोकांची वाहवा मिळवून गेली. परंतु त्यांच्या सभा मनसे उमेदवारांसाठी न होता त्या फक्त काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी होत असल्याचा संदेश लोकांमध्ये गेला. त्यामुळे यावेळी मनसेचे खाते रिकामेच राहीले. दरम्यानच्या काळात शिवसेना आणि भाजपामध्ये दुरावा निर्माण होत शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जवळ गेली आणि त्याचा परिपाक महाविकास आघाडीच्या रूपात राज्यातील जनतेसमोर आहे.

सत्तेत आल्यानंतर शिवसेनेनेही मराठीच्या प्रश्नी कायदा करत मुंबईतील दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात, मराठी भाषा उभारण्याचा प्रश्न यासह राज्याच्या कारभारात आणि महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मराठीचा वापर करण्याबाबत कायदाच केला. त्यामुळे मनसेला आता मराठीच्या मुद्यावर राजकारण करायला जागाच ठेवली नाही. तसेच शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेनेला पूर्वी प्रमाणे हिंदूत्वाची प्रखर भूमिका घेण्यास अडचण असली तरी त्यांनी अद्याप हिंदूत्व सोडले नाही हे सातत्याने सांगत आहेत. परंतु शिवसेनेच्या या भूमिकेमुळे मनसेसमोर प्रश्न निर्माण झाला की आता काय भूमिका घ्यायची? यातून हिंदूत्वाची भूमिका राज्यात भाजपा वगळता कोणीच घेत नसल्याचे दिसून आले.

त्यातच भाजपाकडूनही फक्त हिंदूत्वाच्या कार्डावरच देशभरातील निवडणूका जिंकत असल्याचे अनेकवेळा दिसून येत आहे. शिवसेना आता महाविकास आघाडीत गेल्याने भाजपालाही महाराष्ट्रात स्थानिक पक्ष युतीसाठी हवाच होता. यातूनच मनसे नेते राज ठाकरे आणि भाजपा नेत्यांच्या गाठीभेटींचा सिलसिला सुरु झाला. या गाठीभेटीतील सर्वच तपशील बाहेर आलेला नसला तरी नेमकी काय डाळ शिजतेय याचा वास राज्यातील जनतेला आलाच. त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी मागील कोरोना काळातील दोन वर्षात भोंग्याचा विषय असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाती-पातीच्या राजकारणाविषयी असेल याबाबत नेहमीच भाष्य केले. मात्र त्या भाष्यावर राज्यातील जनतेने कोरोना काळामुळे फारसे लक्ष दिले नाही.

परंतु आता कोरोना काळ संपला असून जवळपास सर्वच निर्बंध उठविण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. कोरोनामुळे राज्यासह देशातील जनतेसमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले असताना नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणूकीत चार राज्यात भाजपाच्या हिंदूत्ववादी भूमिकेवर तेथील जनतेने विश्वास दाखविला. या सर्व प्राप्त परिस्थितीत मनसेने राजकारणातील शिवसेनेची हिंदूत्वाची रिक्त असलेली जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा अप्रत्यक्ष हिंदूत्वाची शाल पांघारल्याचे दिसून येत आहे. मात्र यात त्यांना कितपत यश मिळते हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत कळेल.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *